पुणे: उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये या आठवड्यापासून सुरू होणार असल्याची माहिती कोरोना आढावा बैठकीत दिली होती. त्यानंतर पुणे महापालिकेने विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच कोरोना लस दिली जाईल असेही सांगितले होते. पण आज (12 ऑक्टोबर) शहरातील बहुतांश महाविद्यालये उघडलीच नाहीत. एकाबाजूला दीड वर्षांपासून बंद असणारी महाविद्यालये उघडणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते पण महाविद्यालये उघडली नसल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
लेखी आदेशाविना महाविद्यालये कशी उघडायची?
महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्याच्या उच्च शिक्षण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अद्याप महाविद्यालयांना कोणतीही लेखी सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महाविद्यालयांकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. शासनाकडून लेखी आदेश प्रसिध्द केल्यानंतरच महाविद्यालये सुरू होतील, असे विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.
काय आहे विद्यापीठाची भूमिका-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यातील कोरोना स्थिती सुधारत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालये काही निर्बंधासह सुरू करण्यास परवानगी जाहीर झालेली आहे ही आनंदाची बाब आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या व शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येत असून महाविद्यालये पूर्वतयारी करीत आहेत. अहमदनगर, नाशिक तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रात देखील परवानगी बाबत संबधित सक्षम प्राधिकरणाशी विचार विमर्श सुरू असून वस्तीगृहाबाबत देखील पूर्वतयारी सुरू आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांची संख्या विचारात घेता सुरक्षिततेला प्राधान्य देत टप्प्या टप्प्याने प्रक्रिया राबविणे संदर्भात राज्य शासन व उच्च शिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
शासन व विद्यापीठाकडून कोणत्याही सूचना प्राप्त न झाल्यामुळे प्राचार्यांमध्ये महाविद्यालये सुरू करण्याबाबत संभ्रम आहे. तसेच 18 वर्षे वयोमर्यादा असणा-यांसाठी उशीरा लस उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे एक डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असून त्यांची माहिती संकलीत केली जात आहे. - डॉ.सुधाकर जाधवर, प्राचार्य महासंघ, सचिव ,पुणे
महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकतेतर कर्मचा-यांसह किती विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. याबाबतची माहिती संकलीत करण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे. माहिती संकलीत झाल्यानंतर महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. गेल्या आठवड्याभरापासून प्रथम वर्षाचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले असून ऑफलाईन वर्ग सुरू करण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.- डॉ.वृषाली रणधीर ,प्राचार्य, नेस वाडियाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली. त्याचे स्वागतच केले पाहिजे. मात्र, सर्व संलग्न महाविद्यालयांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून याबाबत प्राप्त होणा-या सूचनांची आम्हाला प्रतिक्षा आहे. परंतु, कमी विद्यार्थी संख्येत प्रॅक्टिकल व ऑफलाईन वर्ग सुरू करण्याचे नियोजन महाविद्यालय प्रशासनाकडून केले जात आहे. -डॉ.संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज, गणेश खिंडमहाविद्यालय सुरू करण्याबाबत तयारी सुरू आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रमाणपत्र जमा करून घेतले जात आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून प्राप्त होणा-या आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत.तसेच विद्यार्थ्यांनी घेतलेल्या लसीकरणाची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे.- डॉ. पी.बी.बुचडे, प्राचार्य, आबासाहेब गरवारे कॉलेज, विद्यापीशी संलग्न महाविद्यालयांची संख्या पुणे : ३८८ ,अहमदनगर : १३१ ,नाशिक : १५८
विद्यापीठाशी संलग्न एमबीए इन्स्टिट्यूट : २०८ संशोधन संस्था: ९४ विद्यापीठाशी संलग्न एकूण महाविद्यालये संशोधन संस्था : ९८३विद्यापीठात शिक्षण घेणा-या एकूण विद्यार्थी संख्या : ६.५० लाख