पुणे : गेल्या वर्षी सिंहगड रस्त्यावर मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर पुण्यातील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत गेली. भवानी पेठेनंतर जून तसेच सप्टेंबर महिन्यात सिंहगड रस्ता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सोमवारच्या आकडेवारीनुसार, सिंहगड रस्ता परिसरात सध्या शहरातील सर्वाधिक म्हणजे ४४ रुग्ण आहेत, तर भवानी पेठेत सर्वाधिक कमी म्हणजे कोरोनाचा एकच रुग्ण आहे.
आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात शहराने कोरोनाचा उद्रेक अनुभवला. रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड मिळण्यात येणारी अडचण, वाढता मृत्यूदर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहरातील रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ लागली. त्यानंतर गेले चार महिने रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने दिलासा मिळाला. शहरात ८ फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर पोहोचला आहे.
१४ मार्चच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक रुग्ण सिंहगड रस्ता (४४), बिबवेवाडी (३९) आणि वारजे-कर्वेनगर (३६) या तीन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आढळून आले आहेत. तर, भवानी पेठ (१), ढोले पाटील रस्ता (११) तर शिवाजीनगर-घोले रस्ता (१२) सर्वात कमी रुग्ण आहेत. पुणेकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग संपला आहे, अशा भ्रमात नागरिकांनी राहू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. रुग्णवाढीच्या आलेखात चढ-उतार दिसत असताना सतर्कता एवढा एकच उपाय सध्या अवलंबण्याची गरज निर्माण झाली आहे.
-------------------------------------------------
क्षेत्रीय कार्यालयरुग्ण
औंध-बाणेर २८
भवानी पेठ ०१
बिबवेवाडी ३९
धनकवडी-सहकारनगर १५
ढोले पाटील रस्ता ११
हडपसर-मुंढवा ३३
कसबा-विश्रामबागवाडा १९
कोंढवा-येवलेवाडी १७
कोथरूड-बावधन २७
नगर रस्ता-वडगाव शेरी ३७
शिवाजीनगर-घोले रस्ता १२
सिंहगड रस्ता ४४
वानवडी-रामटेकडी १८
वारजे-कर्वेनगर ३६
येरवडा-कळस-धानोरी १७
----------------------------------
एकूण ३५४