पुणे : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे मतदारसंघात यंदाची स्थिती फारशी चांगली दिसत नाही. लोकसभेसह विधानसभा, तसेच महापालिका निवडणुकीत दारुण पराभवानंतर शहर काँग्रेसला पुन्हा उभारी घेता आलेली नाही. या लोकसभेसाठी सक्षम उमेदवार ठरविण्यापासूनच काँग्रेसचे नेतृत्व चाचपडताना दिसत आहे. त्यातच भाजपाने पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला मैदानात उतरवून काँग्रेसची वाट बिकट केली आहे. यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला पुणेकरांची मते मिळविण्यासाठी झगडावे लागणार, असेच चित्र आहे.काही अपवाद वगळता, पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे, पण २०१४च्या निवडणुकीनंतर या वर्चस्वाला खिंडार पडले आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी सक्रिय असेपर्यंत पुण्यात काँग्रेसचे अच्छे दिन होते. त्यांची पक्ष संघटनेवर चांगली पकड होती, पण आता पक्षाला जणू उतरती कळा लागली आहे. शहर काँग्रेसचे खंबीरपणे नेतृत्व करेल, असा कुणीही नेता सध्या दिसत नाही. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळू लागला. डॉ. विश्वजित कदम यांना उमेदवारी दिल्यानंतर बाहेरचा उमेदवार म्हणून अनेकांनी नाके मुरडली, पण पक्ष नेतृत्वाने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. मोदी लाटेत खासदार अनिल शिरोळे यांनी त्यांचा तब्बल तीन लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.विधानसभेसह पालिकेतही झालेला पराभवविधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. २००९च्या निवडणुकीत काँग्रेसचे दोनच उमेदवार निवडून आले होते. महापालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने २०१७च्या पालिका निवडणुकीतही अस्मान दाखविले. यामध्ये काँग्रेसला कशीबशी दोन आकडी संख्या गाठता आली. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र ४०चा आकडा पार केला. मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. नेतृत्वहीन असलेल्या काँग्रेसचा लोकसभेसाठी उमेदवार ठरविण्यापासून कस लागत आहे.
पुण्यात काँग्रेससाठी सर्वांत कठीण परीक्षेचा काळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:56 AM