पुणे : विभक्त कुटुंबपद्धती, दोघांच्या पगारातील विषमता, नातेवाइकांचा हस्तक्षेप, जोडीदाराकडून वाढत्या अपेक्षा, एकमेकांना वेळ देता येत नसल्याने होत असलेली चिडचिड आदी कारणांमुळे पती-पत्नींच्या नात्यात दुरावा येत आहे. प्रेमविवाह केलेली जवळपास दहापैकी तीन ते चार जोडपी घटस्फोटासाठीन्यायालयात जात आहेत.
एकमेकांना समजून-उमजून नातं फुलविण्यापेक्षाही टोकाची भूमिका घेत थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जात आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. जुळविलेल्या लग्नापेक्षा प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे.
प्रेमाची जागी वादविवाद
लग्नगाठ कांदापोह्याच्या कार्यक्रमांद्वारे जुळविण्यापेक्षा प्रेमविवाह केलेलाच बरा असे अनेक तरुण-तरुणींना वाटत असते. मात्र प्रेमविवाहात एकमेकांबरोबर फिरणे, आवडीनिवडी माहिती असणे हे सर्व आधीच केले असल्याने बहुतांश प्रेमविवाहित जोडप्यांचा लग्नानंतरचा उत्साहच पूर्णत: संपून जातो. प्रेमाची जागा वादविवाद घेते. दोघांचीही ऐकून घेण्याची तयारी नसल्याने भांडणे विकोपाला जातात आणि मग भविष्य व मुलांचा विचार न करताच जोडपी घटस्फोटासाठी न्यायालयात जातात.
नात्याचा शेवट घटस्फोटात
तडजोड करण्याची दोघांचीही तयारी नसल्याने नात्याचा शेवट घटस्फोटामध्ये होतो. विशेष म्हणजे, बहुतांश प्रेमविवाहामध्ये पती-पत्नी दोघेही कमावते असल्याने त्यांना एकमेकांशी जुळवून घेणे कमीपणा वाटत असल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनंतर विवाहित जोडप्यांमध्ये अधिक खटके उडायला लागले आहेत. कामावरून घरी आल्यानंतर कुटुंबाला वेळ न देता मोबाइल किंवा टीव्हीसमोर बसणे, संवादाचा अभाव असणे, एकमेकांना वेळ न देणे यामुळे दाम्पत्यांमध्ये चिडचिडेपणा वाढल्याचे दिसते. टीव्ही मालिकांमधून दाखविले जाणारे सासू-सुनांमध्ये उडणारे खटके, कौटुंबिक कलह याचा परिणामही नात्यामध्ये होत आहे. प्रेमविवाहांमध्ये सर्वाधिक घटस्फोट होण्याचे प्रमाण आहे.
- ॲड. धैर्यशील पाटील
-----------------------