पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या साथीला अटकाव करण्यासाठी पालिकेने विविध ठिकाणांवर ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ जाहिर करुन तेथे उपाययोजना सुरु केल्या आहेत. पालिकेने सोमवारी जाहिर केलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये सर्वाधिक ठिकाणे औंध-बाणेर या ‘स्मार्ट सिटी’च्या परिसरात आहेत. शहरात मागील दोन आठवड्यात १२१ कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आले असून यामध्ये ९५ टक्क्यांपेक्षा अधिक भाग हा बड्या सोसायट्या आणि रहिवासी इमारतींमध्ये असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ११ हजार ९८४ झाली आहे. गेल्या दहा दिवसात ही संख्या दुप्पट झाली आहे. विशेष म्हणजे झोपडपट्ट्यांमधील रुग्णसंख्या नियंत्रित असून बड्या सोसायट्यांमध्येच सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. औंध-बाणेर, हडपसर तसेच कोथरूड तसेच सिंहगड रस्ता परिसरात सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. सुरुवातीला आयुक्तांच्या आदेशानुसार, ४२ सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये वाढ होत ही संख्या संख्या १२१ वर गेली आहे.
=====
१५ मार्च अखेर क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रतिबंधित क्षेत्र
औंध-बाणेर १९, कसबा- विश्रामबाग ९, कोंढवा- येवलेवाडी ११, कोथरूड- बावधन १४, ढोले-पाटील रस्ता ०२, धनकवडी-सहकारनगर १३, नगर रस्ता ०३ , बिबवेवाडी १०, वानवडी- रामटेकडी ०६, वारजे-कर्वेनगर -०६, शिवाजीनगर- घोले रस्ता -०९, सिंहगड रस्ता ०९, हडपसर मुंढवा ०७