--
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील काही अपवाद वगळता बहुतांश शिक्षकांना लसीचा पहिला डोस न देता कोरोनाच्या ड्युटीवर नियुक्त करण्यात आले आहे. तर दुसऱ्या डोसबद्दल विचारही केला जात नाही. त्यामुळे शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवेली तालुका शिक्षक संघाचे नेते व शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश काळभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार : हवेली तालुका हा पुणे शहरालगत विखुरला आहे. शहर, तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत आहे. कोरोनाकाळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या शिक्षकांना वेळोवेळी मागणी करूनही लस देण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. काही तांत्रिक मुद्दे पुढे करून लस देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. असे सांगत शिक्षकांच्या लसीकरणाबाबतच अनास्था का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, असे शासनाचे आदेश आहेत. परंतु लसीकरण करणे तर दूर एखादा शिक्षक कोरोनाबाधित झाला तर त्यांच्या सोबतच्या शिक्षकांनाही कोविड-१९च्या ड्यूटीवर बोलावले जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे काळभोर यांचे म्हणणे आहे.
प्रशासनाकडून फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दोन्ही लसी दिल्या
गेल्या. मग, शिक्षकांच्या बाबतीत इतकी अनास्था का, तालुका प्रशासनाकडे फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या सर्व शिक्षकांची यादी आहे.
रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सर्व आरोग्य केंद्र आणि सर्वेक्षणाला नेमलेले तसेच कोविड सेंटरवर, चेक पोस्ट, लसीकरण केंद्र या ठिकाणी शिक्षक आज फ्रंटलाईन वर्कर म्हणून कार्यरत आहेत. एकमेकांवर बोट दाखवण्याचा प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे काही शिक्षक प्राणास मुुकले आहेत. इन्शुरन्स कंपनी प्रत्यक्ष
रुग्णांशी संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देते. मग शिक्षक या सर्व ठिकाणी काम करत
असताना बाधितांच्या संपर्कात येत नाही काय ? प्रत्यक्ष संपर्कात येऊनही विमा लाभ मिळणार नाही. मग अशा प्रकारे बळी गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याचे काय ? संघटनेच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी हमी दिली जाते. तसेच, लस देण्याबाबत सकारात्मकता दाखविली जाते, परंतु प्रत्यक्षात काम करत असताना मात्र सुरक्षिततेविषयी सोई-सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येते.
तालुक्यात कोरोनामुळे ३ शिक्षकांचा, तर संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या २०० शिक्षकांचा
मृत्यू झालेला आहे. त्यामुळे यंत्रणेच्या या कार्यपद्धतीवर शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त होत असल्याचे काळभोर यांचे म्हणणे आहे.