कुरकुंभ (पुणे): कुरकुंभ येथे पुणे-सोलापूर महामार्गावर एमआयडीसी चौकात रस्ता ओलांडताना एका कामगाराच्या कुटुंबातील सदस्यांवर काळाने घाला घातला. कुटुंबातील अल्पवयीन मुलामुलीसह महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आणखी तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहे. जखमींना दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर एमआयडीसी चौकात संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मृतांची तसेच जखमींची नावे समजू शकली नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भरधाव वाहनाने पाच जणांना चिरडून जवळपास पन्नास फुटांवर फेकले. त्यामुळे तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला व इतर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या मदत पथकाने जाणीवपूर्वक घटनास्थळावरून पळ काढला. तर एक रुगवाहिका जखमींना घेऊन गेल्यावर मृत्युमुखी पडलेले इतर तीन जण तब्बल तासभर रस्त्यावरच पडून होते. त्यातच कामावरून सुटण्याची वेळ असल्याने शेकडोच्या संख्येने नागरीक व कामगारांनी गर्दी केल्याचे आढळून आले. महामार्गाच्या रुग्णवाहिका वेळेत न पोहचल्याने औद्योगिक क्षेत्रातील सिप्ला व अल्कली अमाईन्स या कंपनीच्या रुग्णवाहिकेत शव दौंड येथे हलवण्यात आले.
या सर्व घटनेत महामार्गाची वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच दौंड रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस बळाची विभागणी झाली. मात्र, स्थानिक ग्रामस्थ व उपलब्ध असणाऱ्या पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. या अपघातापूर्वीच याच ठिकाणी वाहनावरील ताबा सुटल्याने मोठा अपघात झाला होता. मात्र यामध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नव्हती. मात्र, अगदी दोन तासांच्या अंतरात हा अपघात झाला.