पुणे : कामासाठी पाच महिन्यांपूर्वी पुण्यात आली असताना चार ते पाच वर्षाची मुलगी तापाने आजारी पडून तिचे निधन झाले़. मुलीच्या निधनाचे खोलवर परिणाम तिच्या आईवर झाला़. तिने आपली मुलगी गेली हे पतीलाही सांगितले नव्हते़. लोहगाव येथे काम शोधण्यासाठी गेली असताना तिला एका ठिकाणी पाच वर्षाची मुलगी दिसली़. आपल्या मुलीसारखीच ती असल्याचे वाटून तिने तिला आपल्याबरोबर घेतले़. इतरांच्या मदतीने त्या मुलीला घेऊन ती सोलापूरला गेली़. इतकेच नव्हे तर ही आपलीच मुलगी असल्याचे तिला पतीला सांगायचे होते़ परंतु, विमानतळ पोलिसांना पाच वर्षाची मुलगी हरविल्याची माहिती मिळताच त्यांनी शोध मोहीम सुरु केली व ती सोलापूरला पोहचण्यापूर्वीच तिला व तिला मदत करणाऱ्या अशा दोघांना ताब्यात घेऊन मुलीची सुखरुप सुटका केली़. हिराबाई ऊर्फ बायडाबाई खंडाळे (वय ५५, रा़ कात्रज) आणि जयश्री शिवाजी कोळी (वय २३, रा़ खड्डा रघुजी ट्रान्सपोर्टजवळ, भवानी पेठ) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत़. ही घटना लोहगाव मधील निंबाळकर नगर येथील लेबर कॅम्पमध्ये १६ नोव्हेंबरला घडली होती़. या प्रकरणी शिवाजी मुरलीधर चांदमाने (वय ३५, रा़ लेबर कॅम्प, प्राईड आशियाना सोसायटीसमोर, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, जयश्री कोळी ही मुळची सोलापूरची राहणारी आहे़. ती जुलै महिन्यात पुण्यात कामासाठी आली होती़. या दरम्यान तिची चार पाच वर्षाची मुलगी तापाने आजारी पडली़ ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचे निधन झाले होते़. याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला़ होता. त्या हिराबाई खंडाळे यांच्याबरोबर १६ नोव्हेंबरला लोहगाव परिसरात कामाच्या शोधासाठी गेल्या होत्या़. हिराबाई पूर्वी या भागात रहात होत्या़. त्यांनी येथे जेवण केले़. त्यावेळी जयश्री हिला तेथे खेळत असलेली ५ वर्षाची अंजली दिसली़. तिला ती आपल्या मुलीसारखीच वाटली़. त्यामुळे तिनेतिला बरोबर घेतले व त्या कात्रजला हिराबाईच्या घरी आल्या़. इकडे अंजली दिसत नसल्याचे तिचा शोध सुरु झाला़,तेव्हा तिच्या लहान बहिणीने आपल्या इथे जेवायला आलेल्या बाईने दिदीला नेल्याचे सांगितले़. त्यांनी तातडीने विमानतळ पोलिसांकडे संपर्क साधला़ विमानतळ पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही गोष्ट आम्हाला समजली़. आम्ही तातडीने सी- वॉचच्या माध्यमातून परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरु केली़. लोहगाव, कलवडवस्ती येथील दोन सीसीटीव्हीमध्ये त्या दिसून आल्या़. त्या फोटोवरुन चौकशी सुरु केली़ तेव्हा हिराबाई खंडाळे यांना ओळखणाऱ्यांनी त्या कात्रज येथे रहात असल्याचे सांगितले़ .पाठोपाठ पोलीस उपनिरीक्षक हणंमत गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कात्रज गाठले़. तेथे गेल्यावर ते सर्व जण सोलापूरला रेल्वेने रवाना झाल्याची माहिती मिळाली़.
सोलापूरला पोहचण्यापूर्वीच पोलिसांचे एक पथक तेथे पोहचून त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली़. याबाबत चौकशी केल्यावर जयश्री कोळी हिच्या मुलीचे निधन झाल्याचे व तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात होत होते़. त्याबाबत अकस्मात मृत्यू अशी पोलिसांनी नोंद केली आहे़, असे पवार यांनी सांगितले.