"आई, मला माफ कर..." विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांनी टोकाचा निर्णय घेत संपविले जीवन
By विवेक भुसे | Published: May 24, 2023 11:06 AM2023-05-24T11:06:14+5:302023-05-24T11:08:15+5:30
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती....
पुणे : विश्रांतवाडीतील ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विकास शिवाजी टिंगरे (वय ४९, रा. पोरवाल रोड, धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.
याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी सांगितले की, विकास टिंगरे हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. टिंगरे यांचे पोरवाल रस्त्यावरील एका पतसंस्थेच्या शेजारील इमारतीत कार्यालय आहे. तेथे ते दुपारी जेवण मागवायचे. काल त्यांनी दुपारी जेवण न मागविल्याने नेहमी जेवण आणून देणारा नोकर फ्लॅटवर आला. तेव्हा टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिंगरे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. ही चिठ्ठी आईच्या नावाने लिहिली असून अजून ती उघडून पाहिली नसल्याचे सोडे यांनी सांगितले. त्यातून त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे. विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहे.