पुणे : अनेकदा रक्ताच्या नात्यापेक्षा सावत्र नाती श्रेष्ठ ठरतात. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दत्तक मुलीला आईने आपली किडनी देऊन जीवनदान दिले आहे. त्यामुळे आईने दत्तक मुलीला जन्म जरी दिला नसला तरी त्यांच्यात आता रक्ताचे नाते तयार झाले आहे.
पुण्यातील जाहंगिर रुग्णालयामध्ये 17 वर्षीय दत्तक घेतलेल्या मुलीला तिच्या आईने आपली किडनी दिली आहे. सराह हॅरीस असे त्या मुलीचे नाव असून तिला जन्मतःच एका असाध्य आजाराने ग्रासले हाेते. गेल्या अनेक वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरु हाेते. हॅरीस कुटुंबीय हे मुळचे बंगळूरचे आहे. सराह चे आई वडील जाेन आणि अॅस्टाॅन यांना सहा मुले आहेत. त्यामुळे त्यांनी सराहला ती दीड वर्षाची असताना दत्तक घेतले हाेते. सराहला चांगले उपचार मिळावेत यासाठी ते दाेन वर्षांपूर्वी बंगळूरहून गाेव्याला स्थायिक झाले हाेते. तेथे तिच्यावर उपचार सुरु असताना त्यांना पुण्यातील जहांगिर रुग्णालयाबाबत माहिती मिळाली. सराहला किडनीची गरज हाेती. तिला किडणी देण्यासाठी तिच्या कुटुंबातील सर्वचजण तयार हाेते. परंतु सराहच्या आईचा आणि तिचा ब्लॅड ग्रुप मॅच झाला. तसेच तिची आई ही मेडिकली फिट असल्याने किडणी देणे शक्य हाेते. जेव्हा तिच्या आईने मुलीला किडनी देण्याचा निर्णय कुटुंबीयांना सांगितला तेव्हा सर्वांनीच पाठींबा दिला. 19 फेब्रुवारीला सराहवर शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पार पडली. दाेघीही मायलेकी सध्या सुखरुप आहेत.
जहांगिर रुग्णालयाच्या ऑरर्गन ट्रान्सप्लॅन्ट काेऑरडिनेटर वृंदा पुसलकर यांनी सांगितले की ज्या आश्रमातून सराहला दत्तक घेण्यात आले हाेते त्यांनी सराहला जन्मापासून असलेल्या आजाराबाबत आम्हाला माहिती दिली. त्यांनतर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर आम्ही या शस्त्रक्रियेला परवानगी दिली.
ही शस्त्रक्रिया डाॅ. श्रीनिवास अंबिके, डाॅ. दीपक किरपेकर, डाॅ. याेगेश साेवनी, डाॅ. धनेश कमरकर, डाॅ. अवंतिका भट यांनी पार पाडली.