पुणे : सिलेंडरचे बटण सुरू ठेवून आईला जीवे मारण्याचा प्रयत्न, सदनिका बळकाविण्यासाठी शिवीगाळ करून तिला शारीरिक व मानसिक छळ करणा-या आणि जेवायला न देता जन्मदात्या आईला घराबाहेर काढणा-या व्यावसायीक मुलाला आणि सुनेला न्यायालयाला दणका दिला आहे.
याचिकाकर्त्या ७४ वर्षीय वृध्द आईस दैनंदिन गरजेसाठी पोटगी स्वरूपात आईला प्रतिमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी दिला आहे. तसेच मुलाने व सुनेने इतरामार्फ त तसेच स्वत: वृध्द आईला त्रास न देण्याचे आदेश दिले असून त्या राहत असलेल्या घरात जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत वृध्द महिलेने अॅड. योगेश पवार, अॅड. हेमंत भांड आणि अॅड. अभिजीत बिराजदार यांच्यामार्फत मुलगा आणि सुनेविरूध्द न्यायालयात धाव घेतली होती. लालमहाज जवळ राहत असलेल्या एका कुटुंबात गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. तक्रारदार महिलेस दोन विवाहित मुले व एक विवाहित मुलगी आहे. वृध्द महिलेनी स्वकष्टातून सदनिका खरेदी केली होती. तक्रारदार आणि त्यांचे पती घराजवळच भेळीचा व्यावसाय करीत. पतीच्या निधनानंतर त्यांचा लहान मुलगा, त्याची पत्नी आणि नातवंडे जबरदस्तीने तक्रारदार यांच्या घरात राहत होती. त्रास देणा-या मुलाचे बुधवार पेठेत दोन कापडाची दुकाने आहे. त्याची पत्नी त्याला व्यवसायत मदत करते.
तक्रारदार यांना जेवायला न देणे, गॅस सिलेंडरचे बटन सुरू ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार त्यांच्या सुनेकडून सुरू होते. तर सदनिका बळकाविण्यासाठी मुलाकडून सतत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून त्रास देणे सुरू होते. मुलाच्या आणि सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. याप्रकरणाच दोषारोपपत्र देखील दाखल झाले आहे. त्यानंतरही मुलाचा आणि सुनेचा जाच सुरूच होता. त्यामुळे दोघांच्याही त्रासाला कंटाळून वृध्द आईने महिलांचा घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत दैनदिन गरजांसाठी पोटगीची मागणी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अॅड. योगेश पवार यांनी केलेल्या युक्तीवादनंतर वृध्द आईला मुलाने १० हजार पोटगी द्यावी, असे आदेश दिले आहेत. तसेच मुलाला आणि सुनेला वृध्द आईच्या सदनिकेत जाण्यापासून मज्जाव केला आहे.
मुलाने याआधी एक फ्लॅटही विकला
तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीने कात्रज येथे एक प्लॅट घेतला होता. लोन करण्यासाठी तो प्लॅट मुलाने नावाकरून घेतला. त्यानंतरही त्याचा त्रास सुरू असल्याने त्याने कात्रजला रहायला जावे, असे तक्रारदार यांनी त्याला सांगितले. मात्र त्याने परस्पर तो फ्लॅट विकून टाकून तक्रारदार यांच्यांत घरात राहू लागला, अशी माहिती अॅड. पवार यांनी दिली.