पुणे : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचं स्थान खूप महत्वाचं असतं. कितीही जन्म घेतले तरी तिचं ॠण कुणीही फेडू शकत नाही. एका मुलाला याचा जिवंतपणीच प्रत्यय आला. आईने आपले मूत्रपिंड देऊन मुलाला पुन्हा एकदा जीवदान दिले.. या ‘वात्सल्यसिंधू आई’ च्या प्रेमपूर्ण कृतीने मुलालाही नि:शब्द केले. २४ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयात ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेला २४ वर्षीय तरुण हा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. तो ‘क्रॉनिक किडनी’ आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे गेल्या ९ महिन्यांपासून त्याच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू होते. तज्ञ डॉक्टरांनी त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला असता त्याच्या ५२ वर्षीय आईने तिचे मूत्रपिंड दानाकरिता संमती दर्शविली. महाविद्यालयीन तरुण असलेल्या रुग्णाचे वडील शिपाई म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नव्हता म्हणून ससूनमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ससूनमधील हे जिवंत दाता असलेले आठवे तर एकूण अठरावे मूत्रपिंड प्रत्यारोपण ठरले. ससूनचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले म्हणाले कुशल वैद्यकीय तज्ञ व अत्याधुनिक उपकरणांनी ससून सुसज्ज होत असल्यामुळे या शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांनी ससूनला देणगी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. ससूनला दिलेल्या देणगीवर ८० जी ची सुविधा उपलब्ध आहे. अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात मूत्रपिंड रोग तज्ञ डॉ. सुरेश पाटणकर, डॉ.राजेश श्रोत्री, डॉ.अभय सदरे, डॉ.शशिकला सांगळे, डॉ.निरंजन आंबेकर, डॉ.संदीप मोरखंडीकर, डॉ.धनेश कामेरकर, डॉ.हर्षद तोष्णीवाल, डॉ.शंकर मुंढे,डॉ. हृषीकेश कोरे भूलतज्ञ डॉ. विद्या केळकर, डॉ.योगेश गवळी यांचा समावेश होता. त्यांना कविता अभंग, फरीदा शेख, अनिता दिंडाल या परिचारिकांचे सहकार्य लाभले. अवयव प्रत्यारोपण समन्वयक अर्जुन राठोड यांनी मोलाची मदत केली.
मूत्रपिंड देत 'वात्सल्यसिंधू' आईने मुलाला दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 8:08 PM