पुणे : इंस्टाग्रामवरुन झालेल्या ओळखीतून एका अल्पवयीन मुलीचा तरुणाशी संबंध आला. त्यातून ती गर्भवती राहिली. आईने हा प्रकार सर्वांपासून लपवून ठेवला. मुलीची घरीच प्रसृती केली. मात्र, लोकलज्जेस्तव नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला त्यांनी कचर्याजवळ टाकून दिले. नागरिकांच्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर आला. उत्तमनगर पोलिसांनी तातडीने हा अर्भकाला हॉस्पिटलमध्ये नेल्याने त्याचा जीव वाचला. राज्य महिला आयोगाने याची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पोस्कोसह दोन गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबतची माहिती अशी, कोंढवे धावडे परिसरातील एका १७ वर्षाच्या मुलीचे इस्ट्राग्रामवरुन एका तरुणाशी ओळख झाली. त्यातून त्यांचे शारीरीक संबंध निर्माण झाले. मुलीला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात नेले़ तेव्हा डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. परंतु, त्यांनी ही बाब सर्वांपासून लपवून ठेवली. शनिवारी रात्री या मुलीची त्यांनी घरीच प्रसृती केली. त्यानंतर त्यांनी सोसायटीच्या पार्किंगच्या मागील बाजूला तोडलेल्या झाडाच्या खोडामध्ये या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला टाकून दिले. रात्रीच्या वेळी कुत्री व मांजर विचित्र का ओरड आहे, हे ऐकून सोसायटीतील काही जणांनी तिकडे जाऊन पाहिल्यावर तर एक बाळ आढळून आले. त्यांनी तातडीने उत्तमनगर पोलिसांना यांची माहिती दिली. महिला पोलीस नाईक शिला जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी या बाळाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. वेळीच लक्षात आल्याने बाळाचे प्राण वाचविण्यात यश आले.
इकडे या मुलीच्या प्रसृतीनंतर रक्तस्त्राव खूप होऊ लागल्याने तिच्या आईने मुलीला लवळे हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तिच्यावर उपचार करुन तिचा जीव वाचविण्यात आला. हॉस्पिटलकडून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पौड पोलिसांनी ही माहिती उत्तमनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब घेतल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी या मुलीसह तिची आईवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.