पुणे : ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या अभियानात स्तनाच्या कर्करोगाचे तब्बल ४८४ संशयित रुग्ण आढळले आहेत. हा कर्करोगच असल्याचे निदान करण्यासाठी त्यांच्या आणखी चाचण्या करण्यात येणार आहेत. अभियानात झालेल्या सर्वेक्षणातून या संशयित महिलांबाबत हा धक्कादायक खुलासा झाला आहे. अन्यथा, त्यांना झालेला आजार कळलाच नसता.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे हे अभियान राबविले जात असून, यात जिल्ह्यातील प्रत्येक महिलेची आरोग्य तपासणी करण्यावर भर दिला आहे. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आढळलेल्या ४८४ महिलांची मॅमोग्राफी चाचणी करण्यात आली. अर्थात, या महिलांमध्ये अशा कर्करोगाची काहीतरी लक्षणे होती. त्याचे पुढचे निदान आणखी चाचण्या केल्यानंतर स्पष्ट होणार असले, तरी प्राथमिक पातळीवर या लक्षणांचे निदान झाले आहे. त्यामुळे पुढील धोका टळला आहे.
ग्रामीण भागात महिला अजूनही आरोग्याबाबत घरच्यांसह डॉक्टरांपासून अनेक आजार व्याधी लपवतात. त्यात आर्थिक कारणांसह सामाजिक कारणेही आहेत. त्यामुळे आजार बळावल्यावर तो नियंत्रणात आणण्यासाठी बराच वेळ व खर्चही होतो. त्यामुळे या आजारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी सांगितले. स्तनाचा कर्करोग कोणत्याही गटातील, कोणत्याही भागातील महिलांना होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत सजग राहायला हवे, असेही डाॅ. वाघ म्हणाले
''स्तनाच्या कर्करोगाबाबत प्रत्येक महिलेने चाळिशीनंतर अशी तपासणी करून घ्यावी. प्राथमिक लक्षणे असली तरी ती कळत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. या अभियानात सापडलेल्या संशयित रुग्णांमध्ये पुढील निदानासाठी आणखी चाचण्या करण्यात येणार आहेत. निदान झाल्यावर त्यांना अन्य मोठ्या रुग्णालयांत उपचार दिले जातील. त्यासाठी त्यांच्या पात्रतेनुसार विविध योजनांचा लाभ दिला जाईल. - डॉ. विजकुमार वाघ, उपजिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे''
तालुकानिहाय संशयित रुग्ण
मावळ २०, मुळशी ०, पुरंदर १०४, शिरूर १, वेल्हा ०, बारामती ३, आंबेगाव ०, भोर ०, दौंड ६५, हवेली ३३, इंदापूर ०, जुन्नर २, खेड ३७.