हिंजवडी : शहर, उपनगरात नवरात्रौत्सवाची नुकतीच सांगता करण्यात आली. विजयादशमीला बहुतांश सार्वजनिक मंडळांनी स्थापन केलेल्या दुर्गामातेची जल्लोषात मिरवणूक काढत निरोप दिला. थेरगाव येथील पवनेच्या केजुदेवी घाटावर सुद्धा अनेकांनी घरगुती घट तसेच सार्वजनिक मंडळांच्या दुर्गामातेच्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, यावेळी आलेल्या उत्साही भक्तांनी साचलेले निर्माल्य सरळ पवना नदीत टाकल्याने नदीची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे, आई जगदंबे, तुझ्या भक्तांना सद्बुद्धी दे ! असं म्हणायची वेळ आता थेरगाव परिसरातील नागरिकांवर आली आहे.
विशेष म्हणजे, केजुदेवी घाटावर सण, उत्सवाच्या काळात पालिकेकडून निर्माल्य जमा करण्यासाठी मोठाले कुंड ठेवण्यात आले आहे. मात्र, याकडे कानाडोळा करत उत्साही नागरिकांनी निर्माल्य नदीत सोडल्याने नदीची पूर्णपणे दुरावस्था झाली. यामुळे, नदी परिसरात घाणीचे साम्राज्य पहायला मिळत असून, प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. पालिकेच्या वतीने पवनाघाट नदी परिसर तात्काळ स्वच्छ करावा अशी अपेक्षा स्थानिक नागरिक करत आहे. दरम्यान, पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करण्यासाठी केजुदेवी धरण परिसरात शेकडो नागरिक, अबाल वृद्ध येत असतात. यावेळी, अनेकांनी पवना नदीची झालेली दुरावस्था पाहून संताप व्यक्त केला. तसेच, आई जगदंबा भक्तांना सद्बुद्धी दे अशा भावना व्यक्त केल्या.