Pune Crime: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत असत आहे. अशातच पुण्यात बॉयफ्रेंडच्या मदतीने आईने स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढत व्हायरल केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता महिलेने मुलीला स्वतःच्या बॉयफ्रेंडसोबत शारिरीक संबंध ठेवायला भाग पाडले. यानंतर आरोपी फरार झाले होते. पीडित मुलीने पोलिसांना या सगळ्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे.
पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच महिन्यांपूर्वी ही सर्व घटना घडली. आईने अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून बॉयफ्रेंड आणि नातेवाईकांना पाठवले होते. अल्पवयीन मुलीने आईचे आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या प्रेमसंबंधाची माहिती घर मालकिणीला दिली होती. त्याच रागातून नराधम आईने हे धक्कादायक कृत्य केले. त्यानंतर आरोपी बॉयफ्रेंडने पीडितेवर अत्याचार केले. या सगळ्या प्रकारानंतर पीडितेची आई आणि तिचा बॉयफ्रेंड फरार झाले होते. मात्र शनिवारी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांपूर्वी १३ वर्षीय मुलीला तिच्या आईचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले. ही माहिती मुलीने त्यांच्या घर मालकिणीला दिली. हे समजल्यावर पीडित मुलीच्या आईने तिला वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली. यातच महिलेच्या बॉयफ्रेंडने मुलीवर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईने या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ आरोपी आईने सर्व नातेवाईकांना पाठवला आणि तिची बदनामी केली. त्यामुळे मुलीला जबर धक्का बसला.
या प्रकारानंतर दोन्ही आरोपी पळून गेले. खडकवासला नांदेड गाव येथील एका चाळीत दोघेही राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शनिवारी दोघांना अटक केली. पोलिसांनी दोघांकडेही या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.