पिंपरी : दोन महिन्यांपूर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद असलेल्या दीपक सदाशिव पवार (वय ३६, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) या तरूणाचा गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून उघडकीस आले आहे. शवविच्छदेन अहवाल प्राप्त झाल्यानंतर केलेल्या तपासात तरूणाची आई व मावसभावाने गळा दाबून खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी दीपकची आई नंदा सदाशिव पवार (वय ५६) आणि मावसभाऊ संदीप ऊर्फ संतोष राजाराम निघुल (वय २८, रा. हिंगणेमळा, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी : दीपकला व्यसन होते. तो वारंवार आई आणि पत्नीशी भांडणे करायचा. त्यांना मारहाण करायचा. यामुळे वैतागलेल्या त्याच्या आईने आपल्या बहिणीचा मुलगा संतोष याच्या साथीने दीपकच्या खुनाचा कट रचला. २१ सप्टेंबरला नशेत दीपक झोपला होता. सायंकाळी या दोघांनी स्कार्फने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर पत्नीने त्याला झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी दीपकचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. (प्रतिनिधी)
आई, मावसभावाकडून तरूणाचा खून
By admin | Published: November 22, 2014 12:04 AM