- किरण शिंदे
पुणे - स्वारगेट लैंगिक अत्याचाराचे प्रकरण नुकतेच घडले असताना पुण्यातून आणखी एक संताप आणणारा प्रकार उघडकीस आला. पत्नी माहेरी गेली असताना बापानेच १४ वर्षीय मुलीवर तब्बल आठ महिने लैंगिक अत्याचार केले. पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुलै २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधना बापाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षे वयाची आहे, तर आरोपी बाप ४५ वर्षाचा आहे. आरोपीचे पत्नीसोबत भांडण झाल्याने पत्नी विभक्त राहत होती. तर घरात १४ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी वडील असे दोघेच राहत होते. सुरुवातीला जुलै २०२४ मध्ये आरोपीने मुलीला धमकी देत आणि मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. याबाबत कुठेही वाच्यता न करण्यास सांगत तिला धमकी दिली. त्यानंतर सतत हा प्रकार सुरू होता. दरम्यान नोव्हेंबर २०२४ मध्ये आरोपीची पत्नी घरी परत आली. मात्र पत्नी कामावर गेल्यानंतर त्याने पुन्हा हा प्रकार सुरूच ठेवला. फेब्रुवारी पर्यंत आरोपी स्वतःच्या मुलीसोबत जबरदस्ती करत लैंगिक संबंध ठेवायचा.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी बालहक्क समितीने नांदेड सिटी परिसरात अशा प्रकारचे कृत्य घडत असल्याची माहिती पुणेपोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर ६४(२)(फ (एम)६५(१),११५(२),३५१ (२) व Poxo ४(२),६,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आरोपी वडिलांना बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.