प्रशांत बिडवे
पुणे : आईचं अकरा दिवसांपूर्वी निधन झालं... वडिलांना डाेळ्यांनी दिसत नाही... आईची वारीची परंपरा पुढे घेऊन जाण्याची आणि विठ्ठल भेटीची लागलेली ओढ पाहून अंध वडिलांसह वारीला निघालाे, अशी भावना भिगवण येथील किशाेर पवार याने व्यक्त केली.
भिगवण जवळील मदनवाडी हे किशाेर याचे मूळ गाव. दाेघे पिता-पुत्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची वाट पाहात संचेती हाॅस्पिटलजवळील चाैकात उभा हाेते. किशाेरची आई शाकू पवार या १६ वर्षांपासून आळंदी-पंढरपूर पायी वारीत सहभागी हाेत हाेत्या. त्यांचे नुकतेच निधन झाले. एकीकडे पत्नीच्या जाण्याचे दु:ख आणि दुसरीकडे पंढरपूर वारीचा तिचा वारसा पुढे नेण्याचा ओढा यातून मार्ग काढत आम्ही पिता-पुत्र माऊलीच्या वारीत सहभागी झालाे, असे किशाेरचे वडील बेंगारी पवार यांनी सांगितले. हे सांगत असताना पत्नीच्या आठवणीने डाेळ्यात अश्रू दाटून आले हाेते.
तरुणपणी भांडणात बेंगारी पवार यांच्या डाेळ्याला ईजा झाली हाेती आणि काही वर्षांपूर्वी दुसऱ्या डाेळ्याला माशाचा गळ लागल्याने ताेही अधू झाला. दाेन्ही डाेळ्यांनी स्पष्ट दिसत नसले, तरी त्यांनी वारीची वाट साेडली नाही. मागील वर्षांपर्यंत पत्नीसह वारीत सहभागी हाेत हाेते. यंदा पत्नीचे निधन झाले आणि तिची साथ सुटली. वारीत खंड पडू नये, यासाठी मुलगा किशाेर त्यांना साेबत घेऊन वारीत सहभागी झाला हाेता.
मी माळकरी !
मी मासेमारीचा व्यवसाय करताे; मात्र, माळकरी आहे. वडिलांची विठ्ठलावर भक्ती असून, त्यांची वारी पूर्ण व्हावी, यासाठी मी देखील वारीत सहभागी हाेत आहे, असे किशाेर याने सांगितले.
''माऊलीच्या वारीत सहभागी झालाे की माझ्या मनाला आनंद हाेताे आणि समाधान मिळतं म्हणून मी वारीमध्ये सहभागी हाेऊ लागलाे. - बेंगारी पवार, अंध वारकरी.''