उरुळी कांचन : रेल्वेस्थानकावर चुकलेला दिव्यांग मुलगा युवकांनी सुमारे सहा तासांनी आईच्या स्वाधीन केला. शुक्रवारी (दि. २१) सकाळी ११ च्या सुमारास पिंपरी-चिंचवडच्या सुनंदा भिवाजी चिंचवडे व त्यांचा दिव्यांग तेजस भिवाजी चिंचवडे हे दोघे देवदर्शनाला नांदेडला जाण्यासाठी पुणे स्टेशनवरून उद्यान एक्स्प्रेसने निघाले, उद्यान एक्स्प्रेसला गर्दी असल्यामुळे त्या गडबडीत रिर्झर्वेशनच्या डब्यामध्ये मुलासह चढल्या. डब्यात त्यांना तिकीट चेकरने विचारले, तुम्हाला कोठे जायचे आहे, त्यांनी नांदेडला जायचे, असे सांगितले.त्यावेळी त्यांना तिकीट चेकरने सांगितले, की तुम्ही पुढच्या स्टेशनला जनरल डब्यात बसा, सुनंदा या थोड्याशा गडबडल्या. त्यांच्यासोबत त्यांचा दिव्यांग मुलगा असल्यामुळे त्यांना टेन्शन आले. त्यांनी तिकीट चेकरला विनंती केली, तरीही तिकीट चेकरने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे उरुळी कांचन रेल्वे स्टेशनवर मुलाला घेऊन त्या खाली उतरल्या. गडबडीत जनरल डब्यामध्ये बसल्या, पण या धामधुमीत त्यांचा मुलगा हा उरुळी कांचन रेल्वे स्टेशनवरच राहिला. सुनंदा या आरडाओरडा करू लागल्या, त्यावेळेस त्यांची कोणीही मदत केली नाही.रेल्वे स्टेशनवरून गणेश कांबळे व त्यांचे सहकारीमित्र जात असताना त्यांना तो भेदरलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी त्याची विचारपूस केली. त्याने सांगितले, की माझे नाव तेजस भिवाजी चिंचवडे आहे. नाव सांगितल्याबरोबर आमच्यातला एक मुलगा हा औंध येथे आयटीआय करीत असलेला त्याच्या वर्गात चिंचवडे या नावाचा एक मुलगा होता. त्याला फोनवर विचारल्यावर तो त्याचा चुलतभाऊ निघाला. त्याच्याकडून तेजसच्या आईचा नंबर घेऊन त्यांनी आईशी संपर्क साधला. तेजसला त्याच्या घरी नेले. तेजसची आई दौंडहून आल्यानंतर पोलीस हवालदार कोलते, रजपूत, चितारे व कामठे यांनी खात्री करून माय-लेकरांची गाठ घालून दिली.या कामात गणेश कांबळे यांना उत्तम लोंढे, रोहित, प्रतीक पापडवाले, विवेक कोळी, संदीप मोरे व रमेश कोळी या सर्वांनी माणुसकी दाखवत चुकलेल्या मतिमंद मुलाला आईच्या कुशीत देण्यास मोलाची मदत केली. या घटनेचे परिसरात कौतुक होत आहे.
ताटातूट झालेल्या माय-लेकरांची पुन्हा झाली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 12:02 AM