इंदापूर : 'चोरट्यांनी मला मारले असते तर चालेल असते, मात्र माझ्या छोट्या मुलाला मारता कामा नये' याच हेतूने त्या आईने आपल्या छोट्या मुलाच्या रक्षणासाठी शस्त्रधारी चार दरोडेखोरांचा प्रतिकार केला. या दरोडेखोरांच्या मागे धाव घेत त्यांना पळवून लावले. ही घटना इंदापूर शहरात घडली आहे. विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर हायवेलगत असणाऱ्या काझी फर्निचरशेजारी सादिक शेख यांची जागा आहे. या जागेवरती उत्तर प्रदेशातील एक कुटुंब व काही लोक पुठ्ठ्याचा व्यवसाय करीत आहेत, या ठिकाणी त्यांनी छोटेसे पत्र्याचे शेड राहण्यासाठी उभारले आहेत. या ठिकाणी धर्मराज कश्यप आणि त्याची पत्नी नीलम कश्यप आपल्या छोट्या मुलासह राहत आहेत.
शुक्रवारीच्या (दि. 3) रात्री एक वाजण्याच्या सुमारास चार शस्त्रधारी चोर या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. चोरट्यांनी यावेळी कश्यप यांच्या पत्र्याच्या शेडचा समोरील पुठ्ठा काढून बाजूला टाकला व घरात शिरणार यावेळीही या घरातील महिलाही जागीच होती. ती आपल्या छोट्या मुलाला दुध पाजत होती. चोर घरात शिरत असल्याचे तिच्या लक्षात आले. ते आता आपल्या वरती व आपल्या मुलावर हल्ला करून चोर चोरी करतील या भीतीने त्या महिलेने मला काहीही झाले तरी चालेल पण माझ्या लहान मुलाला काही होता कामा नये, म्हणून तिने यावेळी चोरट्यांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली.
चोरट्यांनी पहिल्यांदा चाकूचा धाक दाखवत त्या महिलेवर हल्ला चढविला. आपल्या मुलावर व आपल्या कुटुंबावर आलेले संकट परतून लावण्याचा प्रयत्न या महिलेने केला. यावेळी या महिलेला चोर चाकूचा धाक दाखवत असतानाही तिने कसलीही भीती न बाळगता महिलेने या चोरांच्या अंगावरती धावून गेली. शस्त्रधारी चार चोरट्यांनी तिचा रुद्र अवतार पाहता घटनास्थळावरून लागलीच पळ काढला, यावेळी ही महिलादेखील चोरांच्या पाठीमागे धावली.
यावेळी तिच्या मागे तिचा पती ही त्या चोरट्यांना दिशेने पाठलाग करीत पुढे गेला. मात्र चोर अंधाराचा फायदा घेत तेथून पळून गेले. विशेष बाब म्हणजे ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यासंदर्भात पोलिस इंदापूर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून इंदापूर पोलिसांनी या महिलेचे कौतुक केले आहे.