येरवडा : घरोघरी जाऊन कचरा वेचणाऱ्या रेखा शिंदे यांची मुलगी शिवानी हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत 80 टक्के गुण संपादन केले. येरवड्यातील जाधव वस्ती येथे राहणाऱ्या रेखा शिंदे या मागील पंधरा वर्षांपासून स्वच्छ संस्थेत कचरावेचक म्हणून काम करतात. त्यासोबतच चार घरची धुणी-भांडी देखील करतात.
पती संजय मजुरी करतात. शिवानी मॉर्डन हायस्कूल येथे शिकत असून कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असताना देखील आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत तिने हे यश संपादन केले. शिवानी व तिचा मोठा भाऊ आई-वडिलांसह येथे राहतात. लॉकडाऊनमुळे शिक्षणामध्ये अनेक अडचणी आल्या. या संस्थेसोबत समाजातील काही जागरूक घटकांनी मदत केली. ज्यांच्या घरी घरकाम करत होते त्यांनी देखील ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल उपलब्ध करून दिला. कोणत्याही खाजगी क्लास न लावता शाळेतील अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन याच्या मदतीने हे यश संपादन केल्याचे शिवानी सांगते. आई-वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन भविष्यात चांगले शिक्षण घेऊन आयपीएस होण्याचा मनोदय शिवानीने व्यक्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल स्वच्छ संस्थेसह परिसरातील नागरिक, नातेवाईक तसेच अनेकांनी शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले आहे.