केडगाव : देलवडी येथील ग्रामस्थांनी मदर्स डेनिमित्त गट-तट विसरून सुमारे दीड लाखाची लोकवर्गणी गोळा करून ‘आईचे बन’ साकारणार असल्याचे स्पष्ट केले. या वनांमध्ये देशी व आयुर्वेदिक वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. मंदिर व रस्त्याच्या कडेने देखील ५०० विविध वृक्षांची लागवड करणार असल्याचे देखील सांगितले.
मदर्स डेच्या मुहूर्तावर ‘एक मित्र-एक वृक्ष’ देलवडी संघटनेची बैठक संपन्न झाली. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत सभेसाठी ग्रामस्थ हजर होते. या वेळी ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी देलवडी परिसरामध्ये ३ ठिकाणी वृक्षारोपण करायचे असून त्यापैकी एका ठिकाणी ‘आईचे बन’ साकारायचे असल्याचे सांगितले. मुथा यांनी परदेशातून ग्रुपसाठी दहा हजार रुपये निधी जमा झाल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी एक ट्री-गार्ड व एक झाड यासाठी प्रत्येकी ७०० रुपये इच्छुक दात्यांच्या वतीने घेणार असल्याचे जाहीर केले. इच्छुकांनी आपली मदत जाहीर करा, असे सांगण्यात आले. यावेळी अवघ्या १५ मिनिटांमध्ये देलवडी ग्रामस्थांच्या वतीने सुमारे दीड लाखाची मदत जाहीर करण्यात आली. ग्रामपंचायत देलवडी यांच्या वतीने झाडे लावण्यासाठी खड्डे, पाण्याची सोय, माती मोफत देणार असल्याचे सांगण्यात आले. युवकांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक झाले.
यावेळी ‘एक मित्र-एक वृक्ष’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मुथा म्हणाले की, देलवडी ग्रामस्थांचा वृक्षलागवडीचा प्रचंड उत्साह आहे. ग्रामस्थांनी झाडे लावण्यासोबतच जगवण्यात देखील मदत करतील अशी अपेक्षा आहे. गट-तट विसरून प्रथमच वृक्ष संवर्धनासाठी एकवटलेली शक्ती मी पहिली. जय मल्हार विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम .जाधव यांनी विद्यालयातील १२० मुले झाडे जगवण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडतील, असे सांगितले.
०९ केडगाव
देलवडी येथे मदर्स डे निमित्त आयोजित बैठकीत बोलताना प्रशांत मुथा.