प्राजक्ता पाटोळे पुणे : दुर्धर आजारामुळे समाज त्यांना नाकारतो, आप्त त्यांना दुरावतात. प्रेम आणि आपुलकीच्या स्पर्शाला दुरावलेली ही मुले दहा वर्षांपासून आई-वडिलांची ‘ममता’ अनुभवत आहेत. कात्रज परिसरातील एक दाम्पत्याने निरपेक्ष भावनेमधून ‘एचआयव्ही’बाधित मुलांचे संगोपन करण्याचा ध्यास घेतला असूनप्रेमाला पारखी झालेली ही चिमणी पाखरं मायेची ऊब अनुभवत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा आणि अमर बुडूख या दोघांनी कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडी भागात १० वर्षांपूर्वी ‘ममता फाउंडेशन’ नावाची संस्था सुरू केली. ज्यांच्या स्पर्शालाही लोक घाबरतात, अशा एड्सग्रस्त मुलांचा सांभाळ करायला त्यांनी सुरुवात केली. स्वत:ची कोणतीही चूक नसताना एचआयव्हीसारख्या आजाराला बळी पडलेल्या या चिमुकल्यांना त्यांनी हक्काचे अंगण आणि आकाश उपलब्ध करून दिले. या ठिकाणी २० मुली आणि १५ मुले अशी ३५ मुले आनंदाने खेळत-बागडत आहेत.आई-वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहणाºया या मुलांच्या यातना पाहून संचालिका शिल्पा बुडूख भावनिक झाल्या. त्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अनघा पुरोहित-परांजपे, सचिन पुरोहित, शरद सोनवणे, प्रताप निकम हे कार्यकर्ते रात्रंदिवस मुलांसोबत वेळ घालवतात.येथील बरीचशी मुले अनाथ आहेत, तर अनेकांचे नातेवाईक आणि पालकही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. मग या मुलांचे पालक कोण? असा प्रश्न त्यांच्या शाळांच्या दाखल्यांवर नाव लिहिताना पडतो. त्यामुळे सर्वच मुलांचे वडील म्हणून अमर बुडूख यांचे नाव लावले जाते आणि आई म्हणून शिल्पा यांचे. योग्य प्रकारे काळजी व औषधोपचार यामुळे या निरपराध चिमुकल्यांचे सरासरी आयुष्य वाढले आहे. मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न संस्थेसमोर आहे.संस्थेला सहकार्य करणारे अनेक अदृश्य हातही आहेत. परंतु, या सेवाकार्यात कधीकधी समाजातील विकृतांचाही सामना करावा लागतो. या दुर्लब घटकांना सोबत घेऊन चालणा-यांची संख्या सुदैवाने मोठी आहे.
एचआयव्हीबाधित चिमुकल्यांना आई-वडिलांची ‘ममता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:36 AM