मागील आठवड्यात खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी दुपारी गस्त घालत असताना राजगुरुनगर येथील पाबळ रोड येथे दोन व्यक्ती वेगवेगळ्या कंपनीच्या दोन मोटारसायकलवर संशयीतरीत्या आढळून आले. त्या व्यक्तीना थांबवून पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता नवनाथ विजय पवार (वय २१, रा. माळवाडी साकुर, ता. संगमनेर), सुनील रामनाथ जाधव (रा. माणुसवाडी, रणंखाब, संगमनेर) अशी नावे सांगून या दोन्ही गाड्या दि.२७ जानेवारी रोजी चोरी केल्या आहेत, अशी कबुली दिली. पोलिसांनी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी पथक तयार करून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी संगमनेर तालुक्यात सापळा लावला. अजित रावसाहेब केदार (रा. रणखांब उपळी, ता. संगमनेर ) रमेश अंबादास दुधवडे (रा. खैरेदरा, नांदुर, ता. संगमनेर), शिवाजी पोपट कातोरे (रा. जांबुत, ता. संगमनेर) यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच खेड तालुक्यातील राक्षेवाडी पाबळ रोड येथे एक ज्युपीटर मोटारसाइकल, तसेच घारगाव, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, निघोज, पारनेर, अकोले येथून १५ मोटारसायकळ चोरुन आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुमारे ४ लाखांच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत. पोलिस विभागीय आधिकारी अनिल लबांते, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार सचिन जतकर, निखिल गिरीगोसावी, स्वप्निल गाढवे, सुधीर शितोळे, संतोष मोरे, विशाल कोठावळे, संतोष शिंदे यांनी सहभाग घेतला. तपास पोलीस हवालदार बाळकृष्ण साबळे करत आहे.
खेड पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले असून त्याच्याकडून १६ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.