यवत, दि.11- यवत येथे पोलीस निरीक्षकावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कार पळवून नेली आहे. ही घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास यवत येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राजवळ घडली. नानवीज (ता.दौंड) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक महेश शिवलिंगप्पा तेलगंजी आज सकाळी महामार्गावरून जात असताना सदर हल्ला करण्यात आला.जखमी अवस्थेतील तेलगंजी यांना यवत मधील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या उजव्या पायाच्या घोट्यात गोळी रुतून बसल्याचे समोर आले. याचवेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी हॉस्पिटलमध्ये येत विचारपूस केली.तर जखमी तेलगंजी यांच्या पायातील गोळी काढण्याच्या शत्रक्रियेसाठी त्यांना ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले.
रविवारी सुट्टी असल्याने पोलीस निरीक्षक तेलगंजी हे त्यांच्या पुण्यातील मांजरी बुद्रुक मोरेवस्ती येथील घरी आले होते.सोमवारी सकाळी ते पहाटे साडेपाच वाजता घरातून एकटेच निघाले होते .पुणे सोलापूर महामार्गावरून नानविज (ता.दौंड) कडे जात असताना यवत येथील वीज उपकेंद्राजवळ आले असताना त्यांच्याकडील स्विफ्ट कारच्या (क्र. एम.एच.१२, एन.९२४४) पाठीमागून पांढऱ्या रंगाची मारुती इरटीका गाडी येत होती.त्या गाडीमधील लोकांनी तेलगंजी यांना इशारा करून गाडीच्या पाठीमागील चाकाची डिस्क निघाली असल्याचे सांगितले.त्यामुळे तेलगंजी यांनी गाडी थांबवली आणि आणि ते बाहेर आले.त्यावेळी मारुती गाडीतील चौघांपैकी एकाने त्यांच्या उजव्या पायावर गोळी झाडली.तर दुसर्याने डाव्या पायावर गजाने मारले.यामुळे तेलगंजी जागेवर कोसळले.ते पडताच हल्लेखोरांनी त्यांची स्विफ्ट कार घेऊन पोबारा केला.
पोलीस निरीक्षक तेलगंजी मागील दोन महिन्यांपूर्वी नानविज येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात रुजू झाले आहेत.यापूर्वी ते गडचिरोली येथे होते.घटनास्थळी पोलीस अधीक्षक औवेझ हक , अतिरिक्त पोकिस अधीक्षक संजय पखाले , उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांनी भेट दिली.याबतच गुन्हा यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू आहे.