आपटाळे : नवनाथ ग्रंथात हटकेश्वर मंदिर असलेल्या डोंगरास सोन्याचा डोंगर म्हटले आहे. हटकेश्वराच्या दर्शनासाठी तीन वेळा गेल्यास काशी क्षेत्राला गेल्याचे पुण्य लाभते, असा उल्लेख काशीखंड या ग्रंथात आहे. असे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हटकेश्वर मंदिर काळाच्या ओघात मात्र दुर्लक्षित राहिले आहे. या मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळण्याची मागणी वर्षानुवर्षे दुर्लक्षित आहे. या साठी सातत्याने पाठपुरावा करून देखील ग्रामस्थांच्या पदरी मात्र उपेक्षेपलीकडे काहीही पडलेले नाही. आदिवासी भागातील गोद्रे या गावाजवळील डोंगरावर हटकेश्वरमंदिर आहे. या मंदिराची महती अनेक दुर्मिळ ग्रंथात आहे. श्रावण महिण्यात व महाशिवरात्रीला दर्शनासाठी हजारो भाविक व पर्यटक येतात. जुन्नर तालुका हा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असताना हटकेश्वर डोंगर व त्या भोवतालचा परिसर निसर्गरम्य असूनही विकसित झालेला नाही. या डोगरावरुन पिंपळगाव -जोगा धरणाचा जालाशय, हरिश्चंद्रगड, लेण्याद्री गणपती, शिवनेरी किल्ला असे मनमोहक दर्शन घडून येते. त्यामुळे पर्यटकांसाठी देखील हे ठिकाण महत्त्वपूर्ण ठरू शकेल असे आहे. हटकेश्वरमंदिर हे महाराष्ट्रातील एक अतिप्राचीन धार्मिक स्थळ संपूर्ण भारताला माहित व्हावे म्हणून या क्षेत्राला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळावा व पर्यटनस्थळामध्ये समावेश समावेश करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
म्हणे डोंगर सोन्याचा... शाप मात्र उपेक्षेचा!
By admin | Published: September 01, 2015 3:53 AM