पुणे : मागील वर्षी मार्चमध्ये राज्यात कोरोना शिरकाव झाला आणि वर्षभरात त्याने अतिशय उग्र रूप धारण केले आहे. या काळात वृद्धाश्रम, अनाथाश्रम, निराधार आदी सेवाभावी संस्थांसमोर नव्या अडचणींचा डोंगर उभा केला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे देणगीदारांचा ओघ घटला आहे. त्यामुळे या संस्थांसमोर नैमित्यिक खर्चासह भविष्यातील नियोजनाबाबतच्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. पुन्हा लॉकडाऊन लागल्यास आणखी अडचणी वाढणार आहेत.
या काळात देणग्या देणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सेवासुविधा देण्यात मर्यादा येत आहेत. लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वात मोठी अडचण असते ती रेशन, भाज्यांच्या खरेदीची. धान्य वेळेत मिळत नाही की भाजीपाला, दूध वेळेत मिळत नाही. काही संस्थांनी लॉकडाऊन काळात मदत केली. महापालिकेनेसुद्धा मदत केली. परंतु, आर्थिक गाडा हाकताना मात्र संस्थांची दमछाक होत आहे. ज्येष्ठ नागरिक या काळात बाहेर जाऊ शकत नाहीत की त्यांच्यापर्यंत कोणी पोचू शकत नाही. कोरोनाच्या संकटामुळे दातृत्वाचा झरा आटत चालल्याने या संस्थांच्या व्यवस्थापनापुढे भविष्यात काम कसे चालवायचे असा प्रश्न आहे.
--
पुण्यात ५० ते ६० वृद्धाश्रम आहेत. यासोबतच बाल सुधारगृह, अनाथाश्रम, निराधार व्यक्तींची केंद्र, एड्सग्रस्त, विशेष मुलांच्या संस्था मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील अनेक संस्थांना शासनाची मदत मिळते. परंतु, ती पुरेशी ठरत नाही.
--
शासकीय नियमानुसार या संस्थांना त्यांच्याकडे ४५ दिवस पुरेल एवढा धान्यसाठा ठेवावा लागतो. परंतु, मागील लॉकडाऊनचा काळ जास्त दिवसांचा असल्याने अनेक ठिकाणचा धान्य साठा संपत आला होता.
--
काही वृद्धाश्रमे मोफत चालविली जातात. तर, काही वृद्धाश्रमांमध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक त्यांच्याकडील पैसे भरून राहतात. अनेकांना पेन्शन असते. त्यांची खर्च करण्याची क्षमता असली तरी बहुतांश खर्च औषधे आणि उपचारांसाठी होत आहे. मुळातच वृद्धांची शारीरिक क्षमता कमी झालेली असल्याने त्यांना आजारापासूनही जपावे लागते.
--
एचआयव्हीग्रस्त मुलांमध्ये तसेच विशेष मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून संस्थाचालकांनी विशेष काळजी घेतल्याचे सांगितले. अनेकांनी बाहेरील लोकांसाठी केंद्रच बंद ठेवली होती. बाहेरील व्यक्तींना त्यांच्या संपर्कात येऊ न देण्याची खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे संस्थाना भेटी देणारे नागरिक कमी झाले आहेत.
--
सामाजिक कार्यकर्ते, तरुण मुले, लहान मुलांचे वाढदिवस या संस्थांमध्ये जाऊन साजरा करतात. संस्थाना भेट स्वरूपात देणग्या, आवश्यक साहित्य देत असतात. मात्र, कोरोनामुळे हे उपक्रमही बंद झाले आहेत.
--
लॉकडाऊनमुळे मदत कमी झाली आहे. आमच्या संस्थेत एचआयव्हीग्रस्त मुले असल्याने त्यांना फार जपावे लागते. संस्थेचा डोलारा देणग्यांवर चालत असल्याने कोरोनाकाळात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुन्हा सर्व सुरळीत होण्यास किती काळ लागेल हे सांगता येत नसल्याने मुलांची काळजी वाटते.
- शिल्पा बुडूख, संस्थाचालक
---
आमची संस्था १५० वर्षे जुनी आहे. आम्ही आर्थिक नियोजन केलेले असल्याने अडचणीवर मात केली. मात्र, एकूणच जिल्ह्यातील सर्वच वृद्धाश्रमांचे देणगीदार कमी झाले आहेत. लॉकडाऊन काळात संस्था संभाळणे फार अवघड होते. सुविधा देता येत नाहीत.
- एका वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक