पुणे : घोरपडे पेठ परिसरातील अत्यंत सुशीक्षित असलेल्या शेख कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूमुळे घोरपडे पेठ परिसरावर शोककळा पसरली आहे. शेख यांचे एकत्रित कुटुंब घोरपडे पेठ पोलीस चौकीच्या मागे राहत होते. इम्रान शेख हे उच्चशिक्षित असून, मार्केटिंग काम करत. त्यांच्या पत्नी शिबा या लुल्लानगर येथील माऊंट कार्मेल या शाळेमध्ये शिक्षिका होत्या. सध्या सुट्या सुरू असल्याने संपूर्ण कुटुंबाने विशाल गडाजवळील रेहानबाबाच्या दर्ग्याला दर्शनासाठी जाण्याचा बेत आखला होता. इम्रान यांचे दोन भाऊ, दोन बहिणी संपूर्ण कुटुंबासह चार गाड्यांमधून आज सकाळी कोल्हापूरला गेले होते. चारही गाड्या आगेमागेच चालल्या होत्या. मात्र, जेवण करून निघाल्यानंतर एका गाडीचा भीषण अपघात झाला. अन्य तीन वाहनांतील नातेवाईक पुढे आंब्यातील विशाळगड फाट्यावर चौथ्या वाहनाची वाट पहात होते. इम्रान यांच्या मोटारला अपघात झाल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना स्थानिक तरुणांच्या मदतीने जखमी लिबा व सलमा यांना साखरपा आरोग्य केंद्राकडे नेले. छोटी लिबा गंभीर जखमी झाली होती. वाटेतच तिचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत घोरपडे पेठ परिसरातील शेख कुटुंबीयांच्या घरासमोर शोकाकुल नागरिक बसून होते. येथील अनेक तरुण कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. (प्रतिनिधी)
घोरपडे पेठ परिसरावर पसरली शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2016 4:05 AM