पुणे : शहरात रस्त्यांवरच बंद पडणाऱ्या बसेसमुळे होणारी कोंडी रोखण्यासाठी त्या रस्त्यावरून लवकरात लवकर हलविण्याच्या सूचना महापालिका व पोलिसांकडून पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) दिल्या आहेत. किमान १५ मिनिटांत बस बाजूला व्हायला हवी, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
शहरातील वाढत्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महापालिका व वाहतूक पोलिसांच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे पीएमपी बसेसच्या ब्रेकडाऊनच्या मुद्यावरही चर्चा झाली. बैठकीस उपस्थित असलेल्या पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी, तसेच ब्रेकडाऊन झाल्यानंतर बस तातडीने रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी दिली. दररोज बसेसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण १५० हून अधिक आहेत. अनेकदा शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरच बस बंद पडतात. तासन्तास बंद बस रस्त्यावरच उभी राहिल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. हे टाळण्यासाठी बसेसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी होणे आवश्यक आहे. तसेच ब्रेकडाऊन झालेल्या बस तातडीने रस्त्यावरून हलविणे किंवा त्या दुरुस्त करणे गरजेचे आहे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.ठेकेदारांकडील बसेसचे बे्रकडाऊनचे प्रमाण अधिक असल्याचे पीएमपीकडून यावेळी सांगण्यात आले.या मुद्यावरही बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार ठेकेदारांना दंड वाढविणे, किमान १५ मिनिटांत बस रस्त्यावरून बाजूला करणे, ब्रेकडाऊन व्हॅनची संख्या वाढविणे, फिरत्या व्हॅन रस्त्यावर ठेवणे अशा उपाययोजना सुचविण्यात आल्याचे समजते.त्यानुसार पुढील काही दिवसांत ठेकेदारांना ब्रेकडाऊनसाठी ठोठावण्यात येणारा दंड दुप्पट होण्याची शक्यता आहे.