न्हावरे : येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात काररखान्याच्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराचा व आर्थिक गैरव्यवहाराची व बेकायदेशीर कामकाजाच्या चौकशीसाठी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांचगे यांनी मंगळवारपासून (दि. १८) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्ते संजय पांचगे यांच्या म्हणण्यानुसार, सन २००३ ते १८ या आर्थिक वर्षातील कारखान्याच्या लेखापरीक्षणात कारखान्याच्या आर्थिक व इतर बाबींत वारंवार मोठी अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान होऊन कर्जाचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ कारखान्याचा कारभार करण्यास असक्षम ठरले आहेत, तेव्हा त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच, २००३पासून सरासरी ७० टक्के सभासद कारखान्याला ऊस घालत नाहीत. अशा सभासंदाचे सहकाराच्या कायद्यानुसार सभासदत्व रद्द करावे यासह विविध १८ प्रश्नांबाबत पांचगे यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला अखिल भारतीय ग्राहक संघटना, शेतकरी संघटना व पतंजली योग समिती यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष धनंजय गायकवाड, भीमराव जराड, वसंत ढवळे, ठकसेन ढवळे, मनसेचे सुनील खेडकर, शेतकरी संघटनेचे तुकाराम फराटे आदी उपस्थित होते.