पुणे : ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ’ अशा घोषणा देत ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, या मागणीसाठी शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार व राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादीचे प्रवक्ता अंकुश काकडे, नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या काही निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आले आहेत, असा आरोप सर्वच विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यामुळे ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.कर्नाटकच्या निवडणुकीतही ईव्हीएमचा घोळ झाल्याचे समोर आले आहे, असा आरोप करून वंदना चव्हाण म्हणाल्या, ईव्हीएममधील गडबडीमुळे एका मतदार संघातील निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन पुकारले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ईव्हीएमचा घोळ झाल्याचे समोर आले होते. जेवढे मतदान झाले तेवढीच मते मशिनमध्ये मोजली गेली पाहिजेत. मात्र, अनेक ठिकाणी मतमोजणीत घोळ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईव्हीएम व्यवस्थित चालत नसल्याचे दिसून येते. लोकशाहीचा महत्त्वाचा भाग असलेले प्रत्येक नागरिकाचे मत हे मोजताना ग्राह्य धरले पाहिजे, तरच नागरिकांचा लोकशाहीवर विश्वास बसेल. त्यामुळे यापुढील काळात ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.रमेश बागवे म्हणाले, ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याची नागरिकांना शंका आहे. सर्वप्रथम भाजपाचे किरीट सोमय्या आणि सुब्रमण्यम स्वामी यांनीच ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. तसेच ईव्हीएमचा शोध लावणाऱ्या देशातही आता ईव्हीएमद्वारे आता मतदान घेतले जात नाही. तसेच जगातील अनेक प्रगत देशांमध्ये ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेतले जाते. परिणामी ईव्हीएममध्ये घोळ होत असल्याचे वारंवार समोर आल्याने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे.सत्तेसाठी भाजपाकडून लोकशाहीचा खूनकाँग्रेस व जनता दल सेक्युलर या दोन पक्षांची एकूण ११५ आमदार व दोन अपक्ष, असे दोन्ही पक्षांचे मिळून एकूण ११७ आमदार होत असताना कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला आमंत्रित केले. त्यांनी संसदीय लोकशाहीचा खून केला. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने देशात लोकशाहीचा काळा दिवस म्हणून धरणे आंदोलन केले. शहर काँग्रेसच्या वतीने बेलबाग चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, गटनेते अरविंद शिंदे, अजित दरेकर आदी उपस्थित होते.
ईव्हीएम मशिनविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 3:55 AM