दावडी/वाफगांव : सुधारित जमीन अधिग्रहण कायद्याला संसदेत विरोध करून शेतक-यांच्या हक्कसाठी देशभर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कनेरसर ता. खेड येथे आयोजित सेझ बाधित शेतक-यांच्या मेळाव्यात दिला. एमआयडीच्या नवीन कायद्यानुसार या ठिकाणी कुठलाही विकास झाला नसल्याने या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले़ खेड सेझबाबत सरकारची भूमिका योग्य नसल्याने येथील शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सेझ बाधित शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘‘सत्ता ही शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी असते, त्यांना उध्वस्त करण्यासाठी नव्हे, जर सामान्य माणसांचे मुलभूत प्रश्न सुटत नसतील, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर, ही सत्ता काय कामाची ? खेड तालुक्यातील सेझ बाधित शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणार आहे. सेझसाठी ताब्यात घेतलेली जमीन मूळ शेतकऱ्यांना परत द्यावी. तसेच जर या जमिनीत विमानतळ उभारायचाच असेल तर शासनाने चालू बाजारभावाप्रमाणे संबंधित जमीन शेतकऱ्यांकडून ही जमीन विकत घ्यावी. येथे विमानतळास आमचा अजिबात विरोध राहणार नाही. शेवटी शेतकऱ्यांचे आर्थिक हित व या भागाचा विकास महत्वाचा आहे. प्रस्तावित विमानतळ उभारताना नवी मुंबईच्या धर्तीवर शासनाने शेतकऱ्यांना सुखसुविधा दिल्या पाहिजेत.’’ खासदार शेट्टी म्हणाले, सेझ निर्मात्यांनी शेतकऱ्यांना १५ टक्के विकसित जमीन देऊन त्यांना उद्योजक बनविण्याचे आमिष दाखविले होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सेझमध्ये नोकरी देण्याचे कबुल केले होते. परंतु दुर्दैवाने गेल्या आठ वर्षाचा प्रदीर्घ काळात सेझ मागचा खरा उद्देशच सफल झालेला नाही. त्यामुळे शासनाने मुळ शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत करावी. जमीन तीच आहे, शेतकरी तेच आहेत. तरीदेखील सेझवाले याच जमिनी उद्योजकांना ३ ते ४ कोटी रुपये हेक्टर दराने विकत आहेत. ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे.खासदार शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश पांडे, राहुल म्हस्के, खेड तालुका सेझ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब माशेरे, माजी सरपंच मोहन दौंडकर, माजी उपसरपंच बाळासाहेब माशेरे, उत्तम कान्हुरकर, काशिनाथ दौंडकर, संतोष दौंडकर, दिलीप माशेरे, नरेंद्र दौंडकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात आंदोलन
By admin | Published: February 16, 2015 4:30 AM