किवळे : सर्वाधिक वर्दळीच्या देहूरोड - विकासनगर रस्त्यावरील एका मोठ्या गटारीवरील स्लॅब तुटल्याने धोकादायक बनलेल्या गटारीची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने नालासदृश्य बनलेल्या सांडपाणी वाहत असलेल्या गटारात बसून अनोखे आंदोलन करण्यात आले. कॅन्टोन्मेंटच्या अधिका-यांनी सोमवारपासून संबंधित धोकादायक बनलेल्या गटारावर सिमेंट स्लॅब टाकण्याचे काम सुरू करण्याबाबत आंदोलकांना आश्वासन देण्यात आल्याने तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी सांगितले.शंकर मंदिराजवळ वळणावर असलेल्या एका गटारीवर सिमेंट स्लॅब टाकण्यात आलेले होते. ते गेल्या वर्षी तुटल्याने निर्माण झालेल्या भगदाडात मालवाहू वाहनांसह अनेक लहान मोठी वाहने पडून अपघात झालेले आहेत. रस्त्याच्या मधोमध भगदाड पडलेले असल्याने वाहतुकीलाही सतत अडथळा होत असतो. अनेकदा विविध पक्षांनी निवेदने देऊनही ढिम्म प्रशासनाने भगदाडाच्या बाजूने लोखंडी जाळ्या लावण्याव्यतिरिक्त काहीही कार्यवाही केली नाही. उलट देहूरोड येथे उड्डाणपुलाचे काम करणारा ठेकेदार सिमेंट पाईप टाकून गटारांची दुरुस्ती करण्याबाबत वेळोवेळी सांगण्यात येत होते. मंचाच्या वतीने अनेक वेळा मागणी करूनही काम करण्यात येत नसल्याने बोर्ड अधिकाºयांचे लक्ष वेधून संबंधित काम सुरू करण्यासाठी संबंधितांनी गटारात बसून आंदोलन केले. हे वेगळे आंदोलन पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. आंदोलनात अध्यक्ष तंतरपाळे, विजय मोरे, राजकुमार कलिमूर्ती, मेघराज तंतरपाळे, विकास मोरे, संतोष भोसले आदींनी भाग घेतला. बोर्डाचे कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांनी निवेदन स्वीकारून सोमवारपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे उपस्थित होते.
गटारात बसून आंदोलन, सोमवारी काम सुरू करण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 2:24 AM