लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोकशाही संघर्ष संघटनेच्या वतीने मागील बारा दिवसांपासून पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील कार्यालयासमोर वाहक पदाचे परीक्षार्थीचे आंदोलन सुरू आहे. २०१६ साली पीएमपीने वाहक पदासाठी ज्या उमेदवारांची भरती करण्याची हमी दिली होती, ती पूर्ण करण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे.
पीएमपीने २०१६ साली ४९०० वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली. १ जुलै २०१७ ला यासाठी परीक्षा पार पाडली. यात जवळपास २६१ उमेदवार पात्र ठरले. भरती प्रक्रिया टप्याटप्याने राबविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ४०० उमेदवार पात्र ठरले. असे एकूण ६६१ उमेदवार वाहक म्हणून रुजू झाले. थोड्या दिवसांनी तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली. यात १७८४ उमेदवारांचा समावेश होता. मात्र थोड्या दिवसांत देशात लॉकडाऊन लागला. त्यामुळे ही यादी थांबवली गेली. त्या वेळी पीएमपी प्रशासनने उमेदवारांना लॉकडाऊन निघाल्यावर तुम्हाला सेवेत सामावून घेऊ, असे सांगितले असल्याचे उमेदवाराचे म्हणणे आहे. मात्र पीएमपीने ही तिसरी यादी रद्द करून आता पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविले जाणार असल्याचे सांगितल्याने उमेदवार हवालदिल झाले आहे. तेव्हा नव्याने भरती प्रक्रिया न राबविता आधीच्या प्रक्रियेतील उमेदवाराचा यादी ग्राह्य धरावी, अशी मागणी होत आहे. या वेळी विकास गावंडे, ब्रम्हदेव पालवे, अंबादास कोठे, आदिनाथ घुले, गजानन वाघमारे आदी उपस्थित होते.