चाकण : कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले असून, नवीन गावरान कांदाही मोठया प्रमाणावर बाजारपेठेत आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मागील आठवड्यापासून घसरण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य काढून टाकल्यास आणि निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देऊ केल्यास कांद्याच्या निर्यातीला चालना मिळेल आणि कांदा उत्पादकांना त्याचा लाभ मदत होणार आहे. मात्र कांद्याच्या बाबत शासनाची भूमिका दुटप्पी असून कांद्याचे भाव आणखी उतरण्यापूर्वी तातडीने निर्यात मूल्य न हटविल्यास शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि. ३ फेब्रुवारी) तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी दिला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठे कांदा उत्पादक राज्य असून, कांद्याची सर्वाधिक निर्यातदेखील राज्यातूनच होते. यंदा कांद्याचे क्षेत्र देखील वाढून मागील वर्षी प्रमाणेच चांगले उत्पादन झाले आहे. सध्या कांद्याचा हंगाम सुरु झाला असून कांदा बाजारात आवक प्रचंड वाढली असल्याने कांद्याचे दर खाली आले आहेत. कांद्याचे भाव आवक प्रचंड वाढून पुढील काळात आणखी मोठया प्रमाणावर गडगडण्याची भीती आहे. केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यातमूल्य भरमसाठ वाढवून ठेवलेले असल्याने कांदा उत्पादक व निर्यातदार त्याची निर्यात करु शकत नाहीत. सध्या कांद्याचे किमान निर्यात मूल्य ७०० डॉलर प्रति मेट्रिक टन आहे. हे किमान निर्यात मूल्य काढून टाकल्यास आणि मागील वर्षी प्रमाणे कांदा निर्यातीला प्रोत्साहन अनुदान दिल्यास कांद्याची निर्यात मोठया प्रमाणावर करता येऊन कांदा उत्पादकांना चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या बाबत कार्यवाही करावी अन्यथा शनिवारी चाकण येथे खेड तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले.
कांद्यावरील निर्यात मूल्य न हटविल्यास आंदोलन, आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 6:20 PM