इंदापूर : पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आठवडाभरात, सन २०१४-१५ साठी गाळपास आलेल्या उसास किमान २२५० रुपये प्रतिटन प्रमाणे पहिली उचल द्यावी, अन्यथा कसलीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नीलेश देवकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष किरण गोफणे, संतोष ननवरे, तात्यासाहेब कारंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज तशा आशयाची निवेदने कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व इतर संबंधितांना दिली.निवेदनात म्हटले आहे, की गाळपास आलेल्या उसास शासनाच्या नियमानुसार एफआरपीप्रमाणे चौदा दिवसांच्या आत पहिली उचल देणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात यंदाच्या मोसमात गाळपास आलेल्या उसास प्रतिटन १८०० रुपयांप्रमाणे ऊसबिल देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २५०० ते २६४० रुपये प्रतिटनप्रमाणे पहिली उचल दिली आहे. तिकडे साडेबारा टक्के रिकव्हरी मिळते. पुणे जिल्ह्णात साडेअकरा टक्के रिकव्हरी मिळते. एक टक्का रिकव्हरीला २३२ रुपये कमी किंवा जास्त रक्कम दिली जाते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या उचलीच्या प्रमाणात पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊसउत्पादकास किमान प्रतिटन २२५० रुपये विनाकपात एकरकमी द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)
ऊसदरासाठी आंदोलनाचा इशारा
By admin | Published: December 25, 2014 4:56 AM