मंचर : एकलहरे-मंचर गावच्या हद्दीवर पुणे-नाशिक महामार्गच्या बाह्यवळणाचे काम चालू असून जुना पुणे नाशिक रस्ता ते दाधरादेवी या रस्त्याची वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यामुळे या ठिकाणी भूमिगत मार्ग पूल व्हावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी रस्त्यासाठी आज आंदोलन केले. मागणीचा विचार न झाल्यास पंधरा दिवसांनी पुन्हा आंदोलन करणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
खेड ते सिन्नर चौपदरीकरण मंचर बाह्यवळण रस्त्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. एकलहरे मंचर या दोन गावांच्या हद्दीवर सध्या पुणे नाशिक रस्ता ते दाधरादेवी मंदिर या जुन्या रस्त्यावरून या परिसरात असणाऱ्या नागरिकांची वाहतूक बाह्यवळण रस्त्यामुळे ठप्प झाली आहे. शेतकरी, कामगार, प्राथमिक शाळेतील मुले महाविद्यालयीन विद्यार्थी यांची यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. दाधरा देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक ये-जा करत असतात. या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल ने-आण करण्यासाठी या रस्त्याचा वापर मागील ५० वर्षांपासून होत आहे.परंतु बाह्यवळणामुळे मागील ५० वर्षांपासून वापरत असलेला शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांचे दळणवळण बंद झाले आहे.
एकलहरे व मंचर गावच्या सरहद्दीवर या ठिकाणी बाह्य वळण रस्त्याला भूमिगत पूल करावा या मागणीसाठी आज परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले होते. आंदोलन कर्त्यांनी या संदर्भातील निवेदन कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील, उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव, पोलीस निरीक्षक मंचर, प्रकल्प संचालक खेड ते सिन्नर चौपदरीकरण महामार्ग यांना दिले आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र थोरात व शिवसेनेचे संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. उपसरपंच युवराज बाणखेले, बाळासाहेब खानदेशे, अरुण लोंढे, सतीश थोरात, बाळासाहेब बाणखेले, अमर थोरात, संगीता बाणखेले, पांडुरंग बाणखेले आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.