पुणे : मागील काही दिवसांपासून हलगर्जीपणामुळे वारंवार पेपरफुटीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई तसेच परीक्षा विभाग संचालकांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात आंदोलन केले. विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपुर्वीच संकेतस्थळावर झळकल्या होत्या. दि. १५ आणि १६ फेब्रुवारीला या परीक्षा झाल्या. या प्रकाराची काही विद्याार्थ्यांनी विद्याापीठाकडे तक्रार केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचे जाहीर केले आहे. याप्रकरणी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी दोषी आहेत. तसेच परीक्षा विभाग संचालक डॉ. अशोक चव्हाण यांना हे प्रकार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करीत अभाविपने शुक्रवारी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. यावेळी मोर्चा काढून विभागासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच परीक्षा पुन्हा न घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी आंदोलनात प्रतिकात्मकरित्या परीक्षा संचालकांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यावर पैसे फेकुन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. प्रकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांना भेटण्यासाठी आत सोडले जात नसल्याने विद्यार्थ्यांनी गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डॉ. उमराणी यांनी कार्यालयातून बाहेर येत निवदेन स्वीकारले. पुढील दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.-----------
परीक्षा संचालकांच्या हकालपट्टीसाठी अभाविपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 8:11 PM