पुणे: राज्यामध्ये अनेक ठिकाणी नाट्यगृहे आहेत. पण तिथे दररोज नाटकांचे प्रयोग होत नाहीत. त्या ठिकाणी जर चित्रपटांचे शो लावण्याची परवानगी दिली, तर चित्रपटसृष्टीला त्याचा फायदा होईल. तसेच नाट्यगृहांचे उत्पन्न देखील वाढेल. याविषयीचा प्रस्ताव अभिनेत्री गार्गी फुले यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना केली आहे.
पूर्वी संगीत आणि सामाजिक नाटकांचा सुवर्णकाळ या महाराष्ट्राने प्रत्येक नाट्यगृहात अनुभवलेला आहे. कारण तेव्हा नाटकांचे खेळ जास्त व्हायचे तसेच काही मोजकेच चित्रपट प्रदर्शित व्हायचे. परंतु, काळ बदलला आणि चित्रपटांची संख्या वाढल्यामुळे चित्रपटगृह अस्तित्वात आली. परंतु, आताचा काळ लक्षात घेता पुन्हा नाट्यगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची वेळ आली आहे. एक पडदा चित्रपटगृह बंद पडल्यामुळे किंवा त्याची अवस्था बिकट असल्यामुळे प्रेक्षक एक पडदा चित्रपटगृहात चित्रपट पाहिला जात नाहीत. त्यातून मराठी चित्रपटांची अवस्था अजून बिकट आहे. मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये मराठी चित्रपट पाहणे प्रेक्षकांच्या खिशाला परवडण्यासारखे नाही. त्यावर उपाय म्हणून राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागातर्फे नाट्यगृहांमध्ये चित्रपटाचे शो करण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे.
नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपटांचे खेळ दाखविले तर तिकिट देखील कमी होऊ शकते. तसेच नाट्यगृहे रिकामे राहणार नाहीत. त्यांचे उत्पन्न वाढेल. मराठी चित्रपटांना न येणारे प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे वळतील. राज्यात वर्षभरात शंभर मराठी चित्रपटांची निर्मिती होते. पण चित्रपटांना योग्य थिएटर मिळत नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत ते पोचत नाहीत. या सर्व दृष्टीने हा प्रस्ताव देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सर्वच नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखविण्यात यावा याबाबतीत सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा झाली. चर्चेनंतर आमचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्याचे आदेश सांस्कृतिक मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिले, कारण शहरातील नाट्यगृह ही सगळी महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असून महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री हे स्वतः हा मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या मार्फत पुढील कार्यवाहीचे आदेश काढण्यास सांगितले. - बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग
नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपटांचे खेळ दाखविल्यास त्याचा फायदा निर्माते आणि नाट्यगृह या दोघांनाही होऊ शकणार आहे. त्याबाबत आमची आग्रही मागणी आहे. सांस्कृतिक मंत्री आणि सरकारने त्यावर विचार करायला हवा - मकरंद अनासपुरे, अभिनेता