पुणे : कचरा ओसंडून वाहणारे शहर अशी ओळख झालेल्या पुण्याची कंटेनरमुक्त शहर होण्याकडे वाटचाल सुरू आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची वाढती संख्या व स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने केलेली जनजागृती यामुळे शहरातील ३ हजार कंटेनरची (लोखंडी कचराकुंड्या) संख्या आता फक्त ७५० वर आली आहे. झोपडपट्टीसारख्या परिसरात असलेले हे कंटेनरही काढून टाकण्यासाठी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रयत्नशील आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागाने या सर्व उपायांचा प्रभावी पाठपुरावा केल्यामुळे आता शहरातील कंटेनर वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवकांकडून होणाऱ्या कंटेनरच्या मागणीत घट झाली आहे. पालिकेने खासगी संस्थांच्या साह्याने शहरात सुरू केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांमुळे हे शक्य झाले आहे. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याची, तो कचरावेचकांजवळच जमा करण्याची सवय लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. कचरा रस्त्यावर जमा होण्याचे प्रमाण वेगाने घटत चालले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सध्या प्रत्येकी ५ टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करणारे एकूण २० प्रकल्प सुरू आहेत. त्याशिवाय मोठे म्हणजे ७०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा १ व प्रत्येकी १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे ३ प्रकल्प सुरू आहेत.शहरातून जमा झालेला कचरा या प्रकल्पांना देण्यात येतो. कचरा जमा करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांबरोबरच पालिकेच्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांचेही व्यवस्थित नियोजन केले आहे. त्यामुळे त्या त्या भागातील कंटेनरमध्ये कचरा जमा होण्याचे प्रमाण कमी झाले. गाडी नियमितपणे येऊ लागल्यावर नागरिकांनाही कचरा इतस्तत: टाकण्याऐवजी तो गाडीतच देण्याची सवय लागली. कचरा जमा करण्यासाठी घनकचरा विभागाने प्लॅस्टिकचे दोन स्वतंत्र डबे दिले. त्यात ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे देण्याची सवय लागल्यानंतर त्या भागातून कंटेनर काढून घेण्यात आले.परिसरात कचरा जमा करण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार घंटागाडी, मोठी गाडी पाठवण्याचे स्वतंत्र वेळापत्रकच घनकचरा व्यवस्थापन विभागाने तयार केले आहे. त्याची अंमलबजावणी होईल, याकडे खास लक्ष दिले जाते. काही ठिकाणी कंटेनर काढून घेतल्यानंतरही तिथे कचरा टाकला जात होता. त्यावर उपाय म्हणून तिथे रांगोळी काढण्याचा उपक्रम राबविण्यात आला. काही ठिकाणी दिवसभर व रात्रीही कर्मचारी बसवून ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)
कंटेनरमुक्त शहराकडे वाटचाल
By admin | Published: August 10, 2016 1:53 AM