गोल्डमॅन कार्यकर्त्यांची चलतीपिंपरी : महापालिका निवडणूक जवळ येऊ लागताच राजकीय पक्षांचे मेळावे, शिबिरे आयोजित केली जाऊ लागली आहेत. या कार्यक्रमांच्या निमित्ताने आलिशान मोटारी दिसू लागल्या आहेत. गळ्यात जाडजूड सोनसाखळी, दोन्ही हातांच्या बोटांमध्ये टपोऱ्या अंगठ्या, ब्रेसलेट असे अंगभर सोन्याचे दागिने परिधान केलेल्या कार्यकर्त्यांची नेत्यांच्या पुढे लुडबूड दिसून येऊ लागली आहे. अशा वजनदार कार्यकर्त्यांच्या शिरकावामुळे खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांची मात्र गळचेपी होत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यास नुकतेच येऊन गेले. कार्यकर्त्यांच्या आलिशान मोटारी मेळाव्याच्या ठिकाणी उभ्या होत्या. कार्यकर्त्यांचा स्तर उंचावला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पूर्वी टेम्पोतून झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी करत कार्यकर्ते एकत्र येत असत. काही कार्यकर्ते दुचाकीला झेंडे लावून येत. आता मात्र कार्यकर्ते काळ्या काचेच्या मोटारीतून नेत्यांसारखेच रुबाबात मेळाव्यासाठी दाखल होऊ लागले आहेत. हा बदल एका अर्थाने चांगला मानला, तरी कार्यकर्त्यांचा उंचावलेला स्तर पक्ष संघटनेच्या दृष्टीने कसा फायद्याचा ठरेल, हे येत्या निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. शहरात झालेल्या फ्लेक्सबाजीबद्दल चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. चेहरा नेत्याचा, धड दुसऱ्याचे अशा प्रकारे विविध क्लृप्त्या केलेले जाहिरातफलक त्यांच्या पाहण्यात आले. एका फलकावर चक्क त्यांचेच छायाचित्र होते. चेहरा त्यांचा होता, हाताच्या बोटांमध्ये अंगठ्या होत्या. हा विचित्र प्रकार पाहून कोणीही असे प्रकार करू नयेत, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले होते. ते प्रकार बंद झाले. परंतु अंगभर दागिन्यांचे प्रदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. (प्रतिनिधी)सोशल मीडियावर संपर्कतीन ते चार सहकारी कायम बरोबर घेऊन आलिशान मोटारीतून फिरणारे कार्यकर्ते सामान्य मतदारांशी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोटारीतून उतरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मोटारीत बसूनच पक्षातील अन्य कार्यकर्त्यांशी सोशल मीडियावर संपर्क साधण्यात गर्क असलेल्या कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष नागरिकांशी संपर्क कमी झाला आहे. दागिन्यांचे प्रदर्शननागरिकांना वॉर्डात कधी कार्यक्रमात दिसून न आलेल्यांना सक्रिय कार्यकर्ते असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून भासविले जाते. त्यांची छायाचित्र असलेले शुभेच्छा संदेश याचा सोशल मीडियावर मारा केला जात आहे. ही स्थिती केवळ राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांचीच नाही, तर अन्य राजकीय पक्षांमध्येसुद्धा दागिन्यांचे प्रदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिरकाव केला.
गोल्डमॅन कार्यकर्त्यांची चलती
By admin | Published: July 14, 2016 12:37 AM