पुणे - जुन्नरमधल्या शिरोली गावातली दीक्षा पारवे या रणरागिनीची सध्या चर्चा आहे. कारण ठरलं बैलगाडा शर्यतीचा घाट. दहावीत शिकणाऱ्या दीक्षाचा बैलगाडा जुंपतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील तिला फोन करुन तिच्या हिंमतीचं कौतुक केलंय. यावर कोल्हे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे.
दिक्षा पारवेचं कौतुक करताना आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अमोल कोल्हे म्हणतात की, शिवजन्मभूमीच्या मातीतील शेतकऱ्याच्या लेकीही मागे नाहीत! जी मायेनं बैलपोळ्याला पुरणपोळी खाऊ घालते ती घाटात गाडा जुंपण्याची हिंमतही दाखवते! आपल्या जुन्नर तालुक्याची कन्या कु. दीक्षा विकास पारवे हिने बैलगाडा जुंपण्याची हिंमत दाखवली! दिक्षा तू महाराष्ट्रातील शूरवीर महिलांच्या परंपरेला साजेसं काम करून दाखवलंय. तुझ्या धाडसाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.'' अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी दीक्षाचं कौतुक केलं आहे.