खा. अमोल कोल्हेंनी आळंदीत केलं आत्मक्लेश; नथुराम गोडसेची भूमिका स्वीकारल्याचा पश्चाताप?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 08:38 PM2022-01-29T20:38:49+5:302022-01-29T20:39:58+5:30
चित्रपटात नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती अमोल कोल्हेंनी व्यक्त केली दिलगिरी.
आळंदी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीका-टिप्पणी केली गेली. शिवाय, या चित्रपट प्रदर्शनास विरोधही दर्शवला गेला. तर, अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. परंतु, राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या विविध चर्चा काही थांबल्या नाहीत. राज्यातील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. यापार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल तीर्थक्षेत्र आळंदीत आत्मक्लेश केला.
महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला (दि.२९) आळंदी येथील इंद्रायणी घाटावर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली आणि आत्मक्लेश करीत या चित्रपटात नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली.
नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खासदार अमोल कोल्हे यांचा आळंदीत आत्मक्लेश! pic.twitter.com/p2Do6xyO2T
— Lokmat (@lokmat) January 29, 2022
"व्हाय किल आय गांधी चित्रपटात नथुरामची भूमिका केली त्यांना पण ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात नाही हे स्पष्ट करताना एखादं नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली ती पाहाता यातून गांधींजींचे विचार आजही तरुणाईत तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले ही महत्त्वाची बाब आहे. महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो," असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.