पुणे : खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांच्यासोबत अजूनही जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता ओवेसींसाठी जलील म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी स्थिती झाली आहे. त्यांच्या पक्षातील अंतर्गत वादातून जलील यांनी परस्पर ही भुमिका जाहीर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यांनी केला आहे.आघाडीकडून एमआयएमला केवळ सात जागा मिळत असल्याने इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी आघाडी तुटल्याचे जाहीर केले. त्यामुळे ‘वंचित’ला मोठा धक्का बसला आहे. त्यावर आता ‘वंचित’कडून सारवासारव सुरू करण्यात आली आहे. याविषयी बोलताना माळी म्हणाले, एमआयएमकडून अधिकृतपणे केवळ १७ जागांचा प्रस्ताव आला आहे. यापुर्वी कधीही शंभर जागा मागितल्या नाहीत. त्यामुळे एवढ्या जागांविषयी चर्चा झालेली नाही. पण जलील यांनी त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेतून स्वतच्या लेटर हेडवर आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची भुमिका म्हणजे एमआयएमची भुमिका नाही.प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या पातळीवर अजून जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दोघांमध्ये चांगला समन्वय आहे. मुस्लिमांसह सर्व समाजाला योग्यपध्दतीने प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. पण जलील यांच्याकडून फुट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे माळी म्हणाले.माळी समाजाचा महामेळावा‘वंचित’च्या वतीने माळी समाजाच्या राज्यव्यापी सत्तासंपादन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरमधील अरण येथे होणार आहे. ‘वंचित’चे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ‘वंचित’चे शंकरराव लिंगे यांनी दिली.
ओवेसींसाठी इम्तियाज जलील म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 6:19 PM