पुणे : पुणेकरांना सरसकट लसीकरण करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय पंतप्रधानांसह आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठविली आहेत. पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून आरोग्यमंत्र्यांना एक पत्र पाठविले आहे. खासदार-आमदारांनी स्वतंत्रपणाने दुसरे पत्र पंतप्रधानांना पाठविले आहे. एकाच दिवसात दोन वेगवेगळी पत्रे ‘रवाना’ केल्याने लोकप्रतिनिधींमध्ये ‘एकवाक्यता’ नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपमधील अंतर्गत घडामोडी या नेहमीच चर्चेच्या ठरतात. शहरात सध्या लसीकरणाची गडबड सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून १८ वर्षांपुढील प्लसर्व पुणेकरांना सरसकट लस दिली जावी. त्याकरिता आवश्यक असलेल्या ५० लाखांचा लसीकरणाचा खर्च उचलण्यास पालिका तयार असल्याचे बिडकर यांनी नमूद केले आहे. हे पत्र पाठवून २४ तास उलटत नाहीत तोच खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना याच अनुषंगाने पत्र पाठविले आहे.
बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, डॉ. सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रामध्ये ३० वर्षांपुढील पुणेकरांना लस देण्याची मागणी केली आहे. या दोन्ही पत्रात पुणेकरांना दिलासा देण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दोन्ही पत्रांमध्ये पुणेकरांच्या ‘फायद्या’चीच मागणी केली आहे. मात्र, दोन वेगेवगळ्या पत्रांमध्ये पुणेकरांच्या वयाचे दोन वेगवेगळे उल्लेख केले आहेत. त्यामध्ये एकवाक्यता नाही.
तसेच काही दिवसांपूर्वी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही अशाच स्वरूपाची मागणी केलेली होती. त्यातच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ४५ वर्षांपुढील सर्वानाच लस देणार असल्याचे मंगळवारी दिल्लीतून जाहीर केले. लसीकरणावरून भाजपाच्या पालिका पदाधिकारी, खासदार-आमदार आणि शहर संघटना यांच्यात एकवाक्यता नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.