लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे जहांगीर रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित झाल्याने त्यांना २५ एप्रिलला जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी गुरुवारी दुपारी सातव यांच्या तब्येतीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. सातव यांना १९ एप्रिलला कोरोना लागण झाली. २२ ला टेस्ट पॉझिटिव्ह आली. २५ तारखेला जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले. तब्येत बिघडल्याने त्यांंना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले आहे.
आवश्यकतेनुसार सर्व उपचार सुरू आहेत.
जहांगीरमधील डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. मला खात्री आहे ते लवकर बरे होतील. कुटुंबातील सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या प्रार्थनाच कामाला येतील. आवश्यकता असल्यास राजीव सातव यांना मुंबईला हलवण्यात येईल, असे विश्वजीत कदम म्हणाले.
दरम्यान, दिल्लीहून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व अन्य काही वरिष्ठ नेते सातव यांच्या प्रकृतीची माहिती थेट रुग्णालयातून घेत असल्याचे समजले. त्यांना मुंबईत नेण्यात येणार होते, मात्र रुग्णालयाने त्यासाठी संमती दिली नाही. त्यामुळे पुण्यातच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.