'पुन्हा अशी दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात'; पवारांनी अजितदादांच्या आमदाराला भरला दम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 01:57 PM2024-03-07T13:57:26+5:302024-03-07T13:59:33+5:30
आज खासदार शरद पवार यांची लोणावळ्यात सभा झाली. या सभेत पवार यांनी दमदाटीवरुन सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.
Sharad Pawar ( Marathi News ) : काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे, राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत उभी फूट पडली असल्यामुळे या निवडणुकीची चांगलीच चर्चा सुरू आहे. बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे, यामुळे आता खासदार शरद पवार स्वत: मैदानात उतरल्याचे दिसत आहे. आज खासदार शरद पवार यांची लोणावळ्यात सभा झाली. या सभेत पवार यांनी दमदाटीवरुन अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांना इशारा दिला.
आज शरद पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला नेत्यांनी जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्त्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप केला आहे. यावरुन आज खासदार शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांना इशारा दिला.
अमित शाहंच्या टीकेला शरद पवारांचा 'पवारस्टाईल' पलटवार; उपस्थितांच्या टाळ्या
लोणावळ्यातील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली हीच मोदींची गॅरेंटी आहे, अशी टीकाही पवारांनी केली.' मला काहींनी सांगितले की आजच्या मिटींगला येऊ नये म्हणून काहींनी आम्हाला दमदाटी केली. टीका केली म्हणूनही फोन करुन दमदाटी केली. लोकशाहीमध्ये जाहीर बोलायचं नाही का? इथल्या आमदारांना मला सांगायच आहे, तुम्ही आमदार कुणामुळे झाला, तुमच्या सभेला कोण आलं होतं, त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष कोण होतं, त्यावेळी पक्षाच्या फॉर्मवर सही माझी होती. तुमच्या आमदाराकीवेळी याच कार्यकर्त्यांनी काम केलं , तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला आज त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी त्यांना विनंती आहे, एकदा त्यांनी दमदाटी केली बास्स पुन्हा असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात', मी या रस्त्याने कधी जात नाही. पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत नाही, असा इशारा शरद पवार यांनी आमदार सुनिल शेळके यांना दिला.
अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर
''केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. याठिकाणी भाषण करताना त्यांनी म्हटलं की, ५० वर्षे शरद पवार महाराष्ट्रावर बसले आहेत. मी त्यांचा आभारी आहे, कारण मला ५० वर्षे लोकांनी निवडून दिलं हे त्यांनी मान्य केलं, असे म्हणत शरद पवारांनी पवारस्टाईल उत्तर दिलं. पहिल्यांदा आमदार, नंतर खासदार, नंतर मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, राज्यसभा हा सगळा काळ पाहिला असता ५६ वर्षे आहे. देशाच्या संसदेत एक माणूस सतत ५६ वर्षे कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे. कारण, मला तुमची साथ आहे.'', असे शरद पवार म्हणाले. यावेळी, त्यांनी राजकीय इतिहास सांगत मावळवासीयांना गांधी-नेहरुंच्या विचारांची आठवणही करुन दिली.