Supriya Sule ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असणार अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता दोन्ही गटाकडून प्रचार, गाठी भेटीला सुरुवातही झाली आहे. जाहीर सभांमधून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात टोकाचा विरोध सुरू असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे काल खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची एका मंदिरात भेट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सुळे आणि पवार यांनी गळाभेट घेतल्याचेही दिसत आहे यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदीरात दर्शनासाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाचवेळी आल्या होत्या, त्यावेळी ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्यांदाच बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे, यामुळे या लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे.
राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त
काही दिवसापूर्वी खासदार सुनिल तटकरे यांनीही बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असतील असं सांगितलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका सुरू आहेत, सुनेत्रा पवार यांनीही बारामती लोकसभा मतदार संघात गाठीभेटी वाढवल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळेंसाठी अजित पवारांचा पुतण्या मैदानात
बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मतदार संघात दोन्ही बाजूंनी प्रचारही सुरू झाला आहे. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार मैदानात उतरल्याचे दिसत आहे.
युगेंद्र पवार यांनी बारामती मतदार संघातील गावांना भेटी वाढवल्या आहेत. कालही बारामती तालुक्यातील गावांना युगेंद्र पवार भेट देत होते. यावेळी त्यांनी मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. गावभेटीवेळी युगेंद्र पवार म्हणाले, "बारामतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून काम करत आहे. मला वाटत आता शदर पवार यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं, आज बारामतीला ओळख ही शरद पवार यांच्यामुळे मिळाली आहे. आपण बाहेर गेल्यानंतर बारामतीचा आहे म्हटल्यावर लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात, त्यामुळे आता आपल्याला शरद पवार यांना पाठिंबा देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.