पुणे : अंबाजोगाई येथील व्यावसायिक भारत रूद्रवार यांचा मुलगा बालाजी हा आपल्या कुटुंबासह नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत न्यू जर्सी येथे वास्तव्य होता. मात्र बुधवारी रात्री त्यांचा व पत्नीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आत्महत्या की खून अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे या प्रकरणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्रालय आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाचं लक्ष वेधले आहे. तसेच केंद्र सरकारने या घटनेेत लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
बालाजी रुद्रवार हे आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाले होते.स्थानिक वेळेनुसार बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला व त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले असता त्यांना घरात बालाजी व आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळले.भारतीय वेळेनुसार ८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता तेथील पोलिसांनी या घटनेबाबत भारत रूद्रवार यांना फोनवरून माहिती दिली.
खासदार सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, न्यू जर्सी मध्ये घडलेल्या बालाजी रुद्रवार आणि त्यांच्या पत्नीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणात भारतीय परराष्ट्र खात्याने लक्ष घालत त्याची सखोल चौकशी करावी. तसेच अमेरिकेत एकट्याच अवस्थेत अडकलेल्या रुद्रवार दाम्पत्याच्या चार वर्षीय चिमुकलीला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती व्यवस्था करावी. .... रूद्रवार कुटुंबाला मानसिक धक्काया घटनेमुळे रूद्रवार कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. मृत आरती या गर्भवती असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, रूद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. शवविच्छेदनानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला हे स्पष्ट होणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत या घटनेची सविस्तर माहिती मिळण्याची शक्यता आहे. या दुर्दैवी घटनेत चार वर्षीय चिमुकली विहा सुखरूप असून तिला शेजाऱ्यांकडे सोपविले आहे. ....
या घटनेबाबत आमदार नमिता मुंदडा यांनी खासदार प्रीतम मुंडे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकारी अमेरिकेतील दूतावासाच्या संपर्कात आहेत. अमेरिकेत रात्रीची वेळ असल्याने माहिती मिळण्यास विलंब होत होता.